अभय व्हनवाडेरुकडी : काटा मारणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनाच आता काटा मारून राजाराम सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा करा. सभासदाचा मालकीचा कारखाना हवा असेल तर परिवर्तन आवश्यक आहे असे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी रूकडी (ता.हातकणगंले) येथे कारखाना निवडणुकीतील प्रचार सभेत सांगितले. अध्यक्षस्थानी हातकणगंले काँग्रेस तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव होते.माजी मंत्री पाटील म्हणाले, गेली २८ वर्षे कारखान्याची लूट सुरू आहे. कारखान्यातील यंञापासून ते कामगार बेडकीहाळकडे नेवून राजाराम कारखान्याचे लूट सुरू असून महाडीक स्वताच्या फायद्यासाठी कारखाना चालवत आहेत. कारखान्यास सलग दहावर्ष उस घातला की एक वर्ष तोट्याचा समजावा अशी स्थिती आहे. बोगस सभासदाव्दारे कारखाना ताब्यात ठेवण्याचा कुटील डाव असून कारखाना सभासदांचा व्हावा व सहकारातील मंदिर टिकावे याकरिता आम्ही ही लढाई लढत असल्याचे सांगितले.महाडिक यांनी डी. वाय. पाटील कारखान्यावर आरोप करू नये. डी. वाय. कारखानाने एफआरएफपेक्षा १५० रूपये ज्यादा दर देवून शेतकऱ्यांचे हित साधले. पण महाडिक हे राजाराम कारखान्याचा दर कमी देतात आणि त्यांच्या खासगी कारखान्याला जास्त दर देत असल्याचेही सांगितले.माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, महाडिक यांना तज्ञ संचालक म्हणून घेतले पण हा व्यापारी संचालक यांच्यात भांडणे लावून कारखाना गिळकृंत केला. कारखान्याच्या दोनशे बैलगाडीचा खर्च राजारामवर, आणि बैलगाडी बेडकीहाळवर अशी लूट सुरू आहे. महाडीक विश्वासघातकी असून सहकारात भगवानराव पवार सारख्या चांगल्या माणसाचा घात केला. कारखान्यात पायपूसणी आणायाचे झाले तरी ते महाडिक यांना विचारावे लागते अशी स्थिती असून व्यापारीच्या हातातील कारखाना काढून सभासदांच्या मालकीचा व्हावा याकरिता सभासद यानी बदल केला पाहिजे. तालुकाध्यक्ष भगवानराव जाधव यांनी, रूकडी व परिसरातून संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी बाजीराव पाटील, शशिकांत खवरे, अॅड.सुरेश पाटील, किरण भोसले, बाबासाहेब देशमुख, राजू ढवळे, शितल देसाई, बाबासाहेब कापसे सह बहुसंख्य सभासद उपस्थित होते. अॅड सुरेश पाटील यांनी आभार व्यक्त केले.तळलेल्या काजूला भुललो..माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी महाडिक यांनी कारखाना कसा गिळकृंत केला याचा किस्सा सांगितला ते म्हणाले, महाडिक यांना आवाडे यांच्यामुळे तज्ञ संचालक म्हणून राजाराम कारखान्यामध्ये घेत असताना आम्ही संचालक महाडिक यांचे तळलेले काजू खावून भुललो व कारखान्याचे नुकसान केले अशी कबूली दिली.कोकरू म्हणून घेतले..महाडिक यांना कोकरू म्हणून कारखान्यात घेतले असता ते लाथ मारत गाढवाचे पिल्लू निघाले असे सांगताच सभासदांत हश्याचे फवारे उडाले..
काटा मारणारे महाडिक यांचा काटा काढा, सतेज पाटील यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 12:28 PM