राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या निकालामुळे आमदार विनय काेरे यांनी उघड नाराजी व्यक्त केली. या नाराजी आडून काही नेत्यांनी अध्यक्षपदाच्या जोडण्या लावल्याने शहकाटशहाच्या राजकारणाला चांगलीच उकळी आली असून शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्रानुसार काहींनी प्रयत्न सुरु केल्याने अध्यक्षपदाची निवडणूक वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निकालानंतर सत्तारुढ आघाडी एकसंध वाटत असतानाच निकालाच्या आकडेवारीवरून निकालानंतर विनय काेरे यांनी आघाडीतील नेत्यांवरच निशाणा साधत, परतफेड करण्याचा इशारा देत भविष्यात मला गृहीत धरू नका, असे सांगितले.
त्यानंतर, खासदार संजय मंडलीक हे अध्यक्ष होत असतील भाजप मित्रपक्षाचे तीन संचालक त्यांना पाठिंबा देतील, अशी गुगली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टाकल्यानंतर अध्यक्षपदाच्या घडामोडींना वेग आला. त्यात मुंबई जिल्हा बँकेत भाजपला एका मताने सत्तेपासून दूर बसावे लागले, तसे कोल्हापूर जिल्हा बँकेत होऊ शकते, असे सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी करुन अंतर्गत घडामोडी काय सुरू आहेत, याचे स्पष्ट संकेत दिले.
कॉंग्रेसमधील संचालकाचे नाव पुढे करून आपला उद्देश साध्य करता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेच्या पाच संचालकांनी एकसंध राहण्यासाठी एक यंत्रणा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करत असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना, कॉंग्रेस एकत्रित येण्याबाबत चाचपणी
शिवसेना पाच व कॉंग्रेसचे पाच असे दहा संचालकांनी एकत्र यायचे. जनसुराज्यचे आमदार विनय काेरे व भाजपचे अमल महाडीक यांना सोबत घेऊन अध्यक्ष पदाचा प्रयोग करता येतो का? अशीही चाचपणी सुरू आहे. मात्र या सगळ्या घडामोडींना पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील सहमत होतील का? यावरच पुढील घडामोडी अवलंबून आहेत.
मुश्रीफ यांनीच अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी दबाव
बँकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक संचालक आहेत, त्यामुळे अध्यक्षपदावर त्यांचाच हक्क राहतो. मात्र मंत्री हसन मुश्रीफ सोडून इतर नाव पुढे आले तर इतर पक्षातील नेत्यांना ते रुचणार नाही. त्यामुळे इतरांचे नाव न सुचवता मुश्रीफ यांनीच एक-दोन वर्षे अध्यक्षपद स्वीकारावे, असा दबाव वाढत आहे.