भारत चव्हाण
कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर करण्याकरिता एक-एक नगरसेवकाला ३५-३५ लाख रुपये द्यावे लागले, अशी जाहीर कबुली आमदार विनय कोरे यांनी रविवारी दिल्यामुळे महानगरपालिकेतील राजकारणात पैशाचा कसा अनैतिक वापर झाला यावर प्रकाशझोत पडला आहे. पैशाच्या जोरावर राजकारण करणे एक दिवस आपल्याही अंगावर उलटले जाऊ शकते याची प्रचिती आता सर्वच राजकीय नेत्यांना आल्यामुळे प्रत्येक ठिकाणी बिनविरोध निवडणूक करण्याची संकल्पना मूळ धरू लागली आहे. कोल्हापूरकरांच्या दृष्टीने ही एक चांगली सुरुवात समजली जात आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेवर १९९० पासून २००५ पर्यंत माजी आमदार महादेवराव महाडिक यांची निर्विवाद सत्ता राहिली. या सत्तेला छेद देण्यासाठी केवळ काँग्रेस, राष्ट्रवादीनेच नाही तर लहान मोठ्या पंधरा ते वीस पक्षांना सोबत घेऊन महाआघाडीनेही प्रयत्न केला. परंतु महाडिकांचा करिष्मा काही त्यांना कमी करता आला नाही. २००० सालातील निवडणूक सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढविली, पण त्यांना जागा मिळाल्या केवळ दोन! यावरूनच सामान्य जनतेत महाडिकांची किती चलती होती ते स्पष्ट होते.
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने सन २००५ मधील महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून झाली. महाडिकांची रणनीती आखणारे प्रा. जयंत पाटील यांनी त्यांची साथ सोडली आणि विनय कोरे यांच्या पक्षात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कोरे यांनी ही निवडणूक ताकदीने लढविली. परंतु त्यांना कसेबसे आठ नगरसेवक तर राष्ट्रवादीला दोन नगरसेवक निवडून आणता आले. महाडिकांनी मात्र ताराराणी आघाडीचे ५० नगरसेवक निवडून आणले. त्यामुळे कोरे-मुश्रीफ यांना महापौर करण्यात अपयश आले. ताराराणी आघाडीकडून सई खराडे या महापौर झाल्या.
ताराराणी आघाडीकडून त्यावेळी सई खराडे यांच्यासह सरिता मोरे, माणिक पाटील अशा तिघी इच्छुक होत्या. तिघांनी दहा - दहा महिने महापौर करण्याचे महाडिक यांनी निश्चित केले होते. कै. महिपतराव बोंद्रे यांच्या आग्रहाखातर पहिला मान सई खराडे यांना दिला. दहा महिन्याच्या कालावधीनंतर त्यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आघाडीत धुसफूस सुरू झाली. ही संधी साधत सन २००७ मधील आॅक्टोबर महिन्यात कोरे यांनी सई खराडे यांना जनसुराज्य शक्ती पक्षात घेऊन पुढील वीस महिन्यापर्यंत महापौरपदावर ठेवले. त्याच दरम्यान जनसुराज्य-राष्ट्रवादी नगरसेवकांचे संख्याबळ ३२ ते ३५ पर्यंत वाढविण्यासाठी कोरे यांनी नगरसेवकांना आपल्याकडे खेचले. पण हे बालंट आपल्यावर उलटणार याचा त्यांना अंदाज आला नाही.
यापुढे तरी शहाणपण दाखवावे
महाडिकांनी प्रभागातील तीन तीन नगरसेवकांना ताकद दिली. जो निवडून येईल तो आपला हे त्यांचे सूत्र होते. महाडिक ज्या स्टाईलने राजकारण करतात, त्या पध्दतीने राजकरण करणे तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनाही जमले नाही. किंबहुना त्यांचा तो स्वभाव नव्हता. त्यामुळेच महाआघाडीचा २००० साली दारुण पराभव झाला. पण विनय कोरे यांनी महाडिकांची स्टाईल स्वीकारली. त्यात ते यशस्वी झाले. पण आलेले अनुभव पाहून त्यांना पश्चातापही झाला. मोठ्या मनाने त्यांनी चूक कबूल केली. पण या सगळ्या प्रकारात नगरसेवक आणि महानगरपालिका बदनाम झाली. यापुढे तरी नेत्यांनी शहाणपणा दाखवायला पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा असेल.