राजाराम लोंढेकोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पातळीवर जागा वाटपाचा तिढा बऱ्यापैकी मार्गी लागला आहे. मात्र, महायुतीमध्ये ‘इचलकरंजी’, ‘करवीर’, ’कोल्हापूर उत्तर’ व ‘चंदगड’ मतदारसंघात घोडे आडले आहे. आघाडीच्या तुलनेत महायुतीमध्ये फारसे आलबेल दिसत नसून अंतर्गत लाथाळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात आमदार विनय काेरे व आमदार प्रकाश आवाडे या मित्रांनी चार-चार जागांची मागणी करत युतीसमोर ‘हबकी’ डाव टाकला आहे. आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता असून, निवडणुकीच्या तोंडावर घातक मानले जाते.
देशातील इतर राज्यांच्या सोबत महाराष्ट्राची निवडणूक झाली नाही, निवडणूक जेमतेम महिनाभर लांबणीवर गेली असली, तरी राजकीय पक्ष नेटाने तयारीला लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्येच सरळ सामना होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये कॉंग्रेसचे विद्यमान चार आमदार आहेत. या जागा कायम राहण्यासाठी कॉंग्रेसचा प्रयत्न असला, तरी त्यांना ‘करवीर’, ‘दक्षिण’, ‘हातकणंगले’ तसेच ‘राधानगरी’ किंवा ‘उत्तर’ पैकी एक, तर उद्धवसेनेला ‘शाहूवाडी’, ‘शिरोळ’ तसेच ‘उत्तर’ किंवा ‘राधानगरी’ पैकी एक व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला ‘कागल’, ‘इचलकरंजी’, ‘चंदगड’ मिळण्याची दाट शक्यता आहे.महायुतीमध्ये दहा जांगा आणि पाच पक्ष असल्याने गुंता वाढत आहे. शिंदेसेनेला ‘राधानगरी’, ‘करवीर’, ‘उत्तर’, भाजपला ‘दक्षिण’, ‘इचलकरंजी’, तर राष्ट्रवादीला ‘कागल’, ‘चंदगड’, ‘शिरोळ’ मिळू शकतात. ‘जनसुराज्य’ला ‘शाहूवाडी’, ‘हातकणंगले’ मिळणार हे निश्चित आहे.
आवाडे धनुष्यबाण घेण्याच्या तयारीत?आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेसाठी राहुल आवाडे यांचे नाव पुढे केले आहे. भाजपने उमेदवारीबाबत अद्याप त्यांना शब्द दिला नसल्याने त्यांनी इतर पर्यायांची चाचपणी केली आहे. शिंदेसेनेत जाऊन ‘धनुष्यबाण’ घेतला, तर भाजपचा जागेवरील दावा आपोआप सुटू शकतो.
तिसरी आघाडीची घोषणा, पण तयार कोठे?महायुती व आघाडीपासून समान अंतरावर आसलेल्या राज्यातील पक्षांना एकत्रित करत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली असली, तरी त्यांची कोल्हापूर जिल्ह्यात तयारी दिसत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली, तर ‘शिरोळ’ वगळता त्यांचा फारसा प्रभाव राहील, असे वाटत नाही.
यड्रावकरांना दोन पक्षांची ऑफर
राजेंद्र पाटील-यड्रावकर हे पूर्वीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे, पण मागील निवडणुकीत ही जागा आघाडीत ’स्वाभिमानी’ला गेल्याने ते अपक्ष निवडून आले. पाच वर्षे त्यांचा एक पाय शिंदेसेनेत, तर दुसरा राष्ट्रवादीत आहे. त्यांचे बिनीचे शिलेदार राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर असतात. विधानसभेला ते ‘घड्याळ’ हातात घेतील, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करत आहे. त्यांना धरून तीन जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. तर, यड्रावकर ‘धनुष्यबाण’ घेतील, असा शिंदेसेनेचा दावा आहे...तर नरकेंना ‘नारळ’ घ्यावा लागेलशिवसेना फुटीनंतर चंद्रदीप नरके हे उशिरा शिंदेसेनेत गेले. हाच मुद्दा रेटत विनय काेरे यांनी ‘करवीर’वर दावा केला आहे. मेळावा घेऊन त्यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर करून नरकेंची गोची केली आहे. काेरे यांनी हट्ट सोडलाच नाही, तर नरकेंना ‘जनसुराज्य’चा ‘नारळ’ घ्यावा लागू शकतो.