इंदुमती गणेश
कोल्हापूर : आर्थिक वर्ष संपायला आता चार महिने राहिल्याने जिल्ह्यातील तीन मंत्र्यांसह ९ आमदारांना २४ कोटी रुपये खर्चाचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्हा नियोजनकडे आलेल्या ४८ कोटी निधीपैकी केवळ १८ कोटी ८७ लाखांची कामे प्रस्तावित आहेत.
जिल्ह्यातील आमदारांना आपल्या भागातील विकासकामांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी आला आहे. या रकमेचे वाटप जिल्हा नियोजन समितीकडून केले जाते. आमदारांकडून प्रस्ताव आले की, त्यांना प्रशासकीय मान्यता देऊन पुढील कार्यवाही केली जाते. पण, आर्थिक वर्ष संपायला आले की, शेवटच्या मार्च महिन्यांत सगळ्यांकडून कामांचे प्रस्ताव येतात. ३१ मार्चच्या रात्रीपर्यंत प्रशासकीय मंजुरीचे काम सुरू असते. आता आर्थिक वर्ष संपायला ४ महिने राहिल्याने कोणत्या आमदाराने किती रुपये खर्च केले आहेत, याची माहिती घेण्यात आली.
खर्च करण्यात राजू आवळे सर्वात पुढे
आतापर्यंत काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे हे निधी खर्च करण्यात सगळ्यात पुढे आहेत. ३ कोटी ९९ लाख रुपयांपैकी ३ कोटी ९३ लाखांच्या निधीचा प्रस्ताव दिला आहे. त्यापैकी १ कोटी १८ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
पी. एन. पाटील सर्वांत मागे
निधी खर्च करण्यात काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील सर्वांत मागे असून, त्यांच्या नावे असलेल्या ३ कोटी ९७ लाखांपैकी ३ कामांसाठी ७५ लाखांचा निधी प्रस्तावित आहे. त्याला अजून मान्यता मिळालेली नाही.
प्रत्येक आमदाराला चार कोटी, जिल्ह्याला मिळाले ४८ कोटी
आपल्या भागातील विकासकामांसाठी पूर्वी आमदारांना २ कोटी मिळत होते. आता त्यात दुपटीने वाढ करण्यात आली असून, प्रत्येकाला दरवर्षी ४ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यानुसार यंदा जिल्ह्यातील १२ आमदारांना असे मिळून ४८ कोटी रुपये मिळाले आहेत.
आमदारांचा शिल्लक निधी
आमदार | शिल्लक निधी | प्रस्तावित कामांची रक्कम | प्रस्तावित कामांची संख्या | प्रशासकीय मान्यता |
डॉ. विनय कोरे | ३ कोटी ७१ लाख | २ कोटी ३० लाख | ३४ | ५ लाख |
प्रकाश आबिटकर | ३ कोटी ७३ लाख | २ कोटी १३ लाख | १८ | १९. ८९ लाख |
राजू आवळे | ३ कोटी ९९ लाख | ३ कोटी ९३ लाख | २५ | १.१८ लाख |
चंद्रकांत जाधव | २ कोटी ८५ लाख | २ कोटी १९ लाख | १३९ | ७६ लाख |
पी. एन. पाटील | ३ कोटी ९७ लाख | ७५ लाख | ३ | ० |
प्रकाश आवाडे | ३ कोटी ४९ लाख | १ कोटी ८९ लाख | १४ | ७१.३४ लाख |
हसन मुश्रीफ | २ कोटी ५३ लाख | १ कोटी ९७ लाख | १० | ० |
राजेंद्र पाटील | ३ कोटी ९९ लाख | १ कोटी २९ लाख | २५ | ३४.९९ लाख |
राजेश पाटील | ३ कोटी ६० लाख | २ कोटी २८ लाख | ३० | ० |
ऋतुराज पाटील | ३ कोटी ८४ लाख | - | २७ | २८.९० लाख |
विधान परिषद
सतेज पाटील | ३ कोटी ५२ लाख | - | ५६ | ६३.३० लाख |
जयंत आसगावकर | ३ कोटी ६० लाख | ८४ लाख | ४ | १७.५० लाख |