सातारा : ग्रामीण भागामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून महिला व बचत गटांची होणाऱ्या फसवणुकीबाबत कर्जमुक्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.सातारा जिल्ह्यातील हजारो महिलांना विविध मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून प्रचंड व्याजदरावर कर्जवाटप केले. त्याच्या वसुली पोटी संबंधित कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात अन्याय करून महिलांचे जगणे मुश्लील केले आहे. कंपनीचे प्रतिनिधी गरजू महिलांना शोधून त्यांच्या अडीअडचणीचे भांडवल करून त्यांना चुकीची माहिती सांगून कर्ज घेण्यास प्रवृत्त करतात. तोंडी माहिती वेगळी, कागदपत्रांवर भलतीच माहिती आणि कर्जवसुलीबाबत निराळे धोरण असल्याचे दिसून येत आहे, असे ‘मनसे’च्या निवेदनात म्हटले आहे.मोर्चामध्ये बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, मराठा महासंघाचे सागर जाधव, मनसे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षी पोळ, सरचिटणीस स्वाती माने, उपाध्यक्ष सुनंदा देसाई, भारती गावडे, इंदिरा लावंड, दीपाली कुंभार, योगिता देसाई, सातारा शहराध्यक्ष राहुल पवार, जिल्हा सचिव अनिता जाधव, अश्विन गोळे, कोरेगाव तालुकाध्यक्ष सागर बर्गे, सुजित पवार, अमित यादव, अविनाश दुर्गवडे, विजय पंडित, यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)...अन्यथा आमरण उपोषण मायक्रो फायनान्सच्या कर्जाला कंटाळून कोल्हापूर जिल्ह्यातील संगीता काटे या महिलेने आत्महत्या केली आहे. अशा प्रकारे राज्यात सर्वत्र आत्महत्येचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. काळे पैसे पांढरे करण्याच्या उद्देशाने मायक्रो फायनान्स कंपन्यांनी राज्यात बाराशे ते पंधराशे कोटींचे कर्जवाटप केले आहे, त्यांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी, कर्जधारक महिलांना अपशब्द व अश्लील शेरेबाजी करणाऱ्या कंपनी प्रतिनिधींवर गुन्हे दाखल करावे, कंपन्यांनी २४ ते ३० टक्के व्याज दराने कर्जावरील घेतलेले व्याज व केलेली वसुली ही शासनाची फसवणूक असून, कष्टकरी महिलांची लूट आहे. हे थांबवण्यासाठी कंपन्यांवर कठोर कारवाई करून महिलांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल, असा इशारा दिला आहे.
मायक्रो फायनान्सविरोधात ‘मनसे’चा मोर्चा
By admin | Published: April 24, 2017 10:00 PM