कोडोली उपजिल्हा रुग्णालयात वृध्दाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पाच तास ताटकळत ठेवणाऱ्या डॉ. सूर्यकांत सातपुते यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी मनसेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कारवाईबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविला असून नियमानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल असे लेखी आश्वासन प्रभारी अधीक्षक डॉ. खाबडे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अशोक कांबळे यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी बुधवार, दि. १४ रोजी त्यांना शस्त्रक्रियागृहात घेण्यात आले होते. परंतु शस्त्रक्रिया झालीच नाही. शिवाय त्यांना पाच तास शस्त्रक्रियागृहात ताटकळत बसावे लागले होते. त्यामुळे डॉ. सातपुते यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मनसेच्या वतीने शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. सकाळी मनसे व शेतकरी संघटना यांचे कार्यकर्ते अधिक्षक यांच्या दालनात जाऊन निलंबनाबाबत चर्चा केली. परंतु ठोस निर्णय न झाल्याने रुग्णालयाच्या समोर आंदोलनकर्ते बसले. यावेळी ग्रामपंचायत सरपंचासह ग्रामपंचायत पदाधिकारी मानसिंग पाटील, प्रकाश पाटील, माणिक मोरे, बाजीराव केकरे, मोहन पाटील आदी सदस्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. कोडोली पोलिस ठाण्याचे सपोनि दिनेश काशिद यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनीही भेट देऊन माहिती घेतली. आंदोलनाबाबतची माहिती डॉ. खाबडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. सातपुते यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करू असे लेखी आश्वासन प्रशासनामार्फत मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनामध्ये मनसेचे पन्हाळा तालुका अध्यक्ष विशाल मोरे, नयन गायकवाड, रमेश मेनकर, तुषार पवार, संजय पाटील, अक्षय बुगले, शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे, संपत पोवार, शिवाजी आंबेकर, सुधीर मगदूम, अक्षय कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.