कोडोली : कोडोली ( ता. पन्हाळा ) येथील उपजिल्हा रुग्णालयात गैरसोयीबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही प्रशासनाकडून पुर्तता होत नसल्याने गुरुवारी कोडोली मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी इमारतीच्या दुरुस्ती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोळी व आयरेकर यांनी इमारत दुरुस्ती संदर्भात आठ दिवसात पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.कोडोली येथील उप जिल्हा रुग्णालयात दररोज दोनशेहुन अधिक रुग्ण लाभ घेत असतात. या रुग्णालयाची इमारत जुनाट असल्याने ती पावसाळ्यात गळत आहे. याचा त्रास रूग्णांना होत आहे. त्याचप्रमाणे निवासी डॉक्टरांसाठी बांधलेली निवासस्थानामध्ये कोणही रहात नसल्याने मोडकळीस आली आहेत.
ही निवासस्थाने दुरुस्ती करावीत तसेच चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी यासाठी वेळोवेळी आंदोलने करत पत्रव्यवहार करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने हे ठिय्या आंदोलन केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षदा वेदक या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आल्या असता मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.
यावेळी सार्वजनिक बांधकामाचे कोळी व आयरेकर यांनी येऊन रुग्णालयाची पाहणी करून आठ दिवसात इस्टिमेंट सादर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी मनसे जिल्हाउपाध्यक्ष संजय पाटील, तालुका अध्यक्ष विशाल मोरे, तालुका उपाध्यक्ष नयन गायकवाड, तालुका सचिव लखन लादे, गणेश झुगर, रोहित मिटके, कोडोली शहर अध्यक्ष रमेश मेणकर,कोडोली उपशहर अध्यक्ष तुषार चिकूर्डेकर, निहाल मुजावर, अक्षय कांबळे यांचेसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.