संतोष भोसलेकिणी : मुदत संपून देखील पुणे-बेंगलोर महामार्गावरील किणी (ता. हातकणंगले) टोल नाक्यावरील टोल वसुली सुरूच ठेवल्याने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यात जोरदार झडापड झाली. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनावेळी सुमारे दहा ते पंधरा मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.राष्ट्रीय प्राधिकरणच्यावतीने मुदत संपून सुद्धा किणी टोलनाक्यावरील टोल वसुली सुरूच ठेवली आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने याआधीच आंदोलन करत गंभीर इशारा दिला होता. अध्यक्ष राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी टोलनाक्यावर बँड पथकाच्या गजरात कलश घेऊन महिला व कार्यकर्ते दाखल झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील टोलनाक्याच्या बुथ जवळील लेनमध्ये कलश ठेवून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली.यानंतर पोलिसांनी जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांना ताब्यात घेत पोलीस गाडीत घालून पोलीस ठाण्याकडे नेले. दरम्यान यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये जोरदार झडापड झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला नेले मात्र, नाक्याजवळ ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी केली.दरम्यान, राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चंद्रकांत बर्डे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना राजू जाधव यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांची लूट चालवली असून मुदत संपलेला टोल नाका बंद होईपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले.आंदोलनात संतोष चव्हाण, प्रवीण माने, वैभव हिरवे, कल्पना पाटील, वंदना संताजी, उज्वला मिसाळ, अक्षय माने, अशोक पाटील, गणेश बुचडे, अजित पाटील , यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वडगांव पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.एन.तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोल्हापूर: मनसेने किणी टोलनाक्यावरील टोलवसुली पाडली बंद, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 4:46 PM