कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरणार असून, किती जागा लढवाव्यात, उमेदवार कोण असावेत, या संदर्भातील निर्णय येत्या आठ दिवसात मनसेप्रमुख राज ठाकरे जाहीर करतील, अशी माहिती पक्षाचे कोल्हापूर संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक मनसे कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून घेण्याकरिता कोल्हापूर संपर्कप्रमुख जयराज लांडगे हे शनिवारी कोल्हापुरात आले होते. लांडगे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना आपला अहवाल देणार आहेत. त्यानंतर ठाकरे निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक राजकीय पक्ष वेगवेगळ्या निवडणुकीची नेहमी तयारी करत असतो, तशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील तयारी करत आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही उतरण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक लढविण्यामागची भूमिका, कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेऊन तसेच एकंदरीत सर्वच परिस्थितीचा आढावा याठिकाणी घेण्यात आला आहे. लवकरच मनसेप्रमुख राज ठाकरे यांना अहवाल देण्यात येईल, त्यानंतर दहा-बारा दिवसात निवडणूक लढविण्याची घोषणा अधिकृतपणे जाहीर होईल, असे लांडगे यांनी सांगितले.
अनेक ठिकाणी उमेदवार उभे करण्यापेक्षा किमान बारा ते पंधरा प्रभागात मनसेचे उमेदवार उभे करुन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. किती उमेदवार उभे करायचे, कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची, निवडणूक लढविण्यामागची भूमिका काय असेल, याची संपूर्ण माहिती पक्षप्रमुख राज ठाकरे जाहीर करणार आहेत.
लांडगे यांनी कोल्हापुरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक सर्किट हाऊस येथे घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, विजय करजगार, दौलत पाटील, रत्नदीप चोपडे, संजय करजगार, विशाल पाटील, मंदार पाटील, अभिजीत राऊत उपस्थित होते.