कोल्हापूर : कळंबा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था भेदून नवे दहा मोबाइल आत गेले. या प्रकरणाचा महानगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीशी काही संबंध आहे का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. सध्या मोक्कासह गंभीर गुन्ह्यांतील अनेक आरोपी कारागृहाच्या गजाआड आहेत, त्यांच्यामार्फत निवडणुकीतील यंत्रणा हालविण्यासाठी नवे मोबाईल कारागृहात पाठविल्याचा संशय पोलीस यंत्रणेनेही व्यक्त केला असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व इचलकरंजीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे.
कळंबा कारागृहात सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील मोक्कासह इतर गुन्ह्यांतील प्रमुख संशयित आहेत. त्यांचा कोल्हापुरात दरारा आहे. सध्या कोल्हापूर महानगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व इचलकरंजी भागातील गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. काही टोळ्यांना राजकीय वरदहस्त असल्याने त्यांना स्फुरण चढले आहे. अनेक टोळ्यांचे म्होरके कारागृहात गजाआड आहेत, तर काहीजण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यात पॅरोलवर कारागृहाबाहेर होते, हे कैदी पॅरोलची रजा संपवून पुन्हा कारागृहात परतत आहेत. त्यांच्यामार्फत काही मेसेज कारागृहात पोहोचले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे, तसेच उमेदवार उभे करण्यापासून ते काहींना उभे राहण्यापासून रोखण्यासाठी गुंडांची यंत्रणा वापरण्यात येत आहे. त्यासाठी हे नवे मोबाईल खरेदी करुन कारागृहात पाठवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यादृ्टीने कोल्हापूर व इचलकरंजीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. या टोळ्यांचे प्रमुख सध्या कळंबा कारागृहात मोक्काखाली आहेत.