पन्हाळा - गुगल पेवरून स्वतःच्याच मोबाईलवर २५० रुपयांचे रिचार्ज मारताना तब्बल ४८ हजारांचा फटका बसल्याची घटना पन्हाळा शहरात घडली आहे. पन्हाळ्यातील शिक्षीका संज्योती माणिक नायकवडी यांनी पन्हाळा पोलिस ठाणे व सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.नायकवडी यांनी आपल्या मोबाईल नंबरवर गुगल पेद्वारे २५० रुपयांचा रिचार्ज मारला, पण त्यांच्या बँक खात्यातुन चुकून २,५०० रुपये कमी झाले याबाबात तसा त्यांना काही मनिटांतच फोन आला व हे २,५०० रुपये आपल्या खात्यावर पुन्हा जमा केले जातील असे सांगितले, मात्र त्यासाठी आपल्या मोबाईलवर एक ओटीपी नंबर येईल, तो आपण सांगावा.सुरुवातीला नायकवडी यांनी ओटीपी नंबर देण्यास टाळाटाळ केली, पण २,५०० रुपये आपल्या खात्यावरुन कमी होतील या भितीपोटी त्यांनी ओटीपी नंबर दिला. हा ओटीपी नंबर देताच त्यांच्या मोबाइलवर तीन वेगवेगळ्या सिमकार्ड द्वारे मेसेज आले त्यानंतर त्यांना आपल्या बँक खात्यातुन ४८ हजार रुपये कमी झाल्याचे समजले.
दरम्यान, तक्रारदार संज्योती नायकवडी यांनी ही घटना आपल्या पतीला कळविली. त्यानंतर दोघे पती - पत्नी पन्हाळा येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत गेले. येथे त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली, पण बँक पैसे परत खात्यावर जमा करण्यासाठी ओटीपीची मागणी करत नाही असे व्यवस्थापकांनी सांगीतले, त्यामुळे आपल्या बँक खात्यावरुन ४८ हजारांची ऑनलाईन चोरी झाल्याचे त्यांचे लक्षात आले.
त्यांनी तत्काळ पन्हाळा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला तसेच सायबर गुन्हे अन्वेषण विभागाकडेही तक्रार अर्ज दिला. एकूणच या घटनेमुळे पन्हाळ्यात ऑनलाईन व्यवहाराच्या विश्वासाहर्तेबाबत उलट-सुलट चर्चा होत होती.