कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृह आवारात पाण्याच्या हौदाजवळ बर्मुडा पॅन्टच्या खिशात मोबाइल हॅन्डसेट व सिमकार्ड असे साहित्य बेवारस अवस्थेत सापडले. त्याबाबत कारागृह प्रशासनाच्यावतीने अनोळखी व्यक्तीविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. कळंबा कारागृहात गेल्या सहा महिन्यांत मोबाइल हॅन्डसेट, गांजा, सिमकार्ड, चार्जर बॅट-या आदी साहित्य सापडल्या आहेत. त्याचीही चौकशी सुरू आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृह आवाराची भक्कम सुरक्षा व्यवस्था भेदून आत मोबाईल, सीम कार्ड, गांजा आदी साहित्य कैद्यांना पुरवल्याचे निष्पन्न झाले आहे. कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी कारागृहातील विविध बराकची झडती घेत अनेक प्रकार उघडकीस आणले आहेत. त्याप्रकरणी अनेक गुंडांना मोक्कासारख्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
गुुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कारागृहाच्या सर्कल नंबर १ बाहेरील पाण्याच्या हौदाजवळ खिळ्याला बर्मुडा पॅन्ट अडकवलेली आढळली. त्या पॅन्टच्या खिशात टेक्नो मोबाईल हॅन्डसेट व सिम कार्ड बेवारस स्थितीत मिळाले. त्याबाबत कारागृह प्रशानातर्फे तुरुंगाधिकारी राकेश देवरे यांनी एका अनोळखी इसमाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सीसी टिव्ही फुटेजमध्ये संशयीत
संशयीत साहित्य मिळाल्याने कारागृहातील सुरक्षा यंत्रणेने सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली असता एक संशयीत कैदी या सीसी टिव्हीच्या कॅमेरात कैद झाल्याचे कारागृह अधीक्षक चंदमणी इंदूरकर यांनी सांगितले.