कोल्हापूर : शिये (ता. करवीर) येथे असलेल्या आयओएन डिजिटल परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याने थेट मोबाईल घेऊन एक तास परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी समोर आला आहे. याचे साक्षीदार अनेक विद्यार्थी आहेत. परीक्षा संपताच विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे आणि परीक्षा केंद्रप्रमुखांकडे तक्रार केली. या प्रकाराचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हा प्रकार विद्यार्थ्यांना समजताच ते परीक्षा केंद्रावर चालून गेले. दरम्यान, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.शिये येथील आयओएन डिजिटल परीक्षा केंद्रावर देशभरातील विविध विभागांच्या परीक्षा सातत्याने होत असतात. यापूर्वीही घेतलेल्या काही परीक्षांमध्येही कॉपीचा प्रकार आढळल्यामुळे समन्वय समितीने व विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे तक्रारी केल्या होत्या.शिये येथील या आयओएन परीक्षा केंद्रावर वनरक्षक पदासाठी सुरू असलेल्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याने चक्क एक तास मोबाइल सोबत घेऊन पेपर सोडविल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे या केंद्रावरचे विद्यार्थी आक्रमक झाले होते. यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. आंदोलक आणि पोलिस यांच्यात काहीकाळ वादावादी झाली.दरम्यान, या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे. जर योग्य कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा समन्वय समितीचे गिरीश फोंडे, जावेद तांबोळी, रवी जाधव, सुनील शेळके यांनी दिला आहे.
Kolhapur News: स्पर्धा परीक्षेवेळी विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात नेला मोबाइल, चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 7:31 PM