कोल्हापूर : कळंबा कारागृहातील बंदिवानांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने गांजा व मोबाईल फेकणाऱ्या ह्यविक्या मन्या गँगह्ण या गुन्हेगारी संघटनेच्या दुसऱ्या फळीतील सात गुंडांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई केली, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली.मोक्कांतर्गत कारवाई केलेल्यांची नावे अशी : ऋषिकेश सदाशिव पाटील (वय २५, रा. कोदवडे, ता. राधानगरी), भिष्मा ऊर्फ भिमा सुभेदार चव्हाण (२८, रा. मूळ रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. संगली. सद्या रा. चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), राजेंद्र ऊर्फ दाद्या महादेव धुमाळ (३०, रा. गणेश कॉलनी, जयसिंगपूर, ता. शिरोळ), जयपाल किसन वाघमोडे (३०, रा. वडीये रायबाग, ता. कडेगाव, जि. सांगली), शुभम सोपाळ येवळे (२३, रा. कारंडे मळा, शहापूर, इचलकरंजी), ओमका ऊर्फ मुरली दशरथ गेंजगे (२२, रा. शहापूर इचलकरंजी), शकील ऊर्फ शकलीन झाकीर गवंडी (२४, रा. सूर्यवंशी गल्ली, इचलकरंजी).इचलकरंजी शहर व परिसरात गुन्हेगारी वर्तुळात कुप्रसिद्ध असलेल्या विकास ऊर्फ विक्या रामआवतार खंडेलवाल व बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर तस्कर मन्या ऊर्फ मनीष रामविलास नागोरी यांच्यासह त्याचे ह्यविक्या मन्या गँगह्ण या संघटित गुन्हेगारी (मोक्का) अंतर्गत कळंबा कारागृहात २०१९ पासून आहेत. गँगच्या दुसऱ्या फळीतील गुंडांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील भिंतीवरून गांजा व मोबाईल फेकून ते आतील सहकाऱ्यांना पुरविल्याचे उघड झाले होते.मोक्कांतर्गत कारवाई झालेल्यांपैकी ओमकार गेंजगे हा खून प्रकरणात कारागृहात असताना त्याने शुभम येवळे याचे मोबाईल कार्ड बाहेर फोन करण्यासाठी वापरले होते. तसेच याच मोबाईलवर विकास खंडेलवाल यानेही बाहेरील सहकाऱ्यांशी संभाषण केल्याचे तपासात उघड झाले होते.
गरुवारी मोक्कांतर्गत कारवाई केलेल्या गुंडांनी कारागृहात व कारागृहाबाहेर साहाय्य केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर ऋषीकेश पाटील, शुभम येवळे, शकील गवंडी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्याप्रकरणी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गँगमधील सातजणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.