कोल्हापूर: देशविरोधी, कामगार विरोधी, समाज विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, कामगार विरोधी कायदे रद्द करा अशा घोषणांनी बुधवारी बिंदू चौक दणाणला.
कोरोनाची दक्षता घेत डाव्या संघटनांनी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली निदर्शने करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदनही दिले. बिंदू चौकात दिलीप पवार, ए.बी.पाटील, यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनात डॉ. सुभाष जाधव, अतुल दिघे, शंकरराव काटाळे, विवेक गोडसे, राजेश वरक, अशोक पाटील यांचा प्रमुख सहभाग होता.केंद्रातील मोदी सरकार बदलत असलेल्या कायद्याविरोधात बुधवारी देशभरातील डाव्या संघटनांनी रस्त्यावर उतरत निषेध नोंदवला. कोल्हापुरातही डाव्या संघटनांनी निदर्शने करत सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवला. कायदे बदलण्यापेक्षा कोरोना व लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनतेच्या वाढलेल्या हालहपेष्टांकडे लक्ष द्या असे कळकळीचे आवाहनही करण्यात आले. बिंदू चौकातील निदर्शनानंतर हे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांना निवेदन सरकारपर्यंत जनतेच्या भावना पोहचवा असे आवाहन केले.मागण्या
- कायदे बदलणे बंद करा
- नवा शैक्षणिक कायदा रद्द करा
- शेतीविषयक तीनही कायदे मागे घ्या
- शेतकरी, शेतमजुरांना कर्जमुक्ती द्या
- दिवाळखोरासाठी ठेवीदारांचा बळी देणे बंद करा
- अंतिम परीक्षा घेणे थांबवाबँक व साखर कर्मचाऱ्यांना विमा कवच द्या
- कामगार व वेतन कपातीवर बंदी आणा
- सार्वजनिक आरोग्यासाठी निधी द्या