कोल्हापूर : दिल्लीच्या सभोवती अर्धसैनिक बल तैनात करून मोदी सरकारने दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याची तयारी केली आहे. स्टॅलिनने रशियात असेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर रणगाडे घालून बळाच्या जोरावर आंदोलन चिरडले होते. आता पंतप्रधान मोदींनी दुसरे स्टॅलिन होऊ नये, नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती अटळ आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.
विधेयक मागे घेईपर्यंत शेतकरी अजिबात मागे हटणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असल्याने मोदींनी पुढचा धोका ओळखून मनाचा मोठेपणा दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीतील चारही बॉर्डरवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन शेट्टी हे कोल्हापुरात परतले आहेत. तेथील अनुभव त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार बैठकीत कथन केला व मोदींना सबुरीचा सल्लाही दिला.
ते म्हणाले, पंजाब, हरयाणातील प्रत्येक कुटुंबातील एकेक सदस्य आंदोलनाला बसला आहे. जमिनीचा तुकडा वाचवण्यासाठी लहान मुले, स्त्रिया, वृद्धासह तरुणही आंदोलनात आहेत, जीव गेला तरी मागे हटायचे नाही, अशी त्यांची ठाम मानसिकता आहे. भडका उडाला तर त्याची किंमत देशाला मोजावी लागेल, तेव्हा मोदी यांनी दोन पाऊले मागे घेत हे विधेयक मागे घ्यावे.