कोल्हापूर : उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची घसरण झपाट्याने होत आहे. यामुळे २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा आपली सत्ता येणार नाही, असे त्यांना वाटत आहे. म्हणूनच ते महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी फोडून लोकसभेला राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी गुरूवारी केला.कोल्हापुरात लोकजागतर्फे शाहू स्मारकभवनात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सद्य राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील भारत हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.केतकर म्हणाले, सन २०१४ मध्ये मोदींचे गारूड डोक्यात बिंबल्याने मोठ्या संख्येने जागा मिळाल्या. मतदारांवरही मोदीवर प्रभाव झाला. विशेषत: उत्तर भारतातील गुजरात, उत्तररप्रदेश अशा राज्यातून भाजपला ४०० जागा मिळाल्या. पण मोदींच्या एकाधिकारशाही, दादागिरीमुळे आता या राज्यातील त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. मोदींचा प्रभाव कमी झाला की भाजपला जागा कमी होतात. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. भाजपमधील मोदी विरोधी नेत्यांवर वॉच यामुळे महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात पक्ष फोडले जात आहेत. सीबीआय, ईडीचा गैरवापर विरोधकांसाठी करीत आहेत. विरोधकांना त्रास देण्यासाठी जशा या यंत्रणाचा वापर केला जात आहे, त्याचप्रकारे भाजपमधील मोदी विरोधी नेत्यांवर वॉच ठेवले जात आहे. तेही मोदींच्या दहशतीखाली आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पक्षावरील आरएसएसचा अकुंश कमी झाला आहे. सध्या आरएसएसचे जुने नेते आणि कार्यकर्ते मोदींसमोर लाचार बनले आहेत. यामुळे मोदींच्या पश्चात भाजपची काँग्रेसपेक्षा वाईट अवस्था होईल. अंतर्गंत कलह उफाळतील असेही ते म्हणाले.
हिंदी भाषिक प्रदेशात प्रभाव कमी झाल्याने मोदींनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली; कुमार केतकर यांचा आरोप
By भीमगोंड देसाई | Published: August 31, 2023 2:27 PM