शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार सोमवारी (दि. २८) पोलिसांनी लक्षतीर्थ वसाहतीच्या परिसरात सापळा रचला. त्यावेळी विनानंबर असलेल्या दुचाकीस्वारास संशयावरून ताब्यात घेतले. त्याने आपले नाव गणेश आसगावकर असे सांगितले; पण विसंगत माहिती दिल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याचा साथीदार शोएब मालदार याचेही नाव निष्पन्न झाले. त्यांनी शहरातील रंकाळा टॉवर, अंबाई टॅँक, डी मार्ट पार्किंग, खाऊगल्ली, खासबाग मैदान, मध्यवर्ती बसस्थानक या परिसरांतून महिनाभरात दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्यानुसार दोघांना अटक करून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी जप्त केल्या.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक योगेश पाटील, सहायक फौजदार विजय कोेळी, अनिल ढवळे, प्रकाश संकपाळ, रमेश डोईफोडे, योगेश गोसावी, प्रदीप पाटील, शाहू तळेकर, परशराम गुजरे, संदीप बेंद्रे यांनी केली.
फोटो नं. २९१२२०२०-कोल-जुना राजवाडा पोलीस
ओळ : कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणांहून चोरलेल्या दुचाकी जुना राजवाडा पोलिसांनी सराईत गुन्हेगार गणेश आसगावकर याच्याकडून जप्त केल्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)