आठ वर्षांनी निकाल : भाऊबंदकीत जमिनीच्या वादातून सशस्त्र हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथे भाऊबंदकीतील शेतजमिनीच्या वादातून तिघा चुलत पुतण्यांवर सशस्त्र हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील नऊजणांना न्यायालयाने बुधवारी दहा वर्षे कारावास व १६ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्रन्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला. घटनेनंतर आठ वर्षांनी निकाल लागला.
शिक्षा झालेल्यांची नावे : तुकाराम सखाराम बाऊचकर त्यांचे भाऊ गुंगा बाऊचकर, विलास बाऊचकर, युवराज बाऊचकर, विजय विलास बाऊचकर, गणेश विलास बाऊचकर, अविनाश गुंगा बाऊचकर, दीपक युवराज बाऊचकर, नीलेश युवराज बाऊचकर (सर्व रा. बच्चे सावर्डे).
शेतीच्या हद्दीच्या वादातून १६ नोव्हेंबर २०१२ ला सशस्त्र हल्ल्याची घटना घडली होती. हल्ल्यात रंगराव बाऊचकर, रामचंद्र बाऊचकर आणि कृष्णात बाऊचकर हे तिघे गंभीर जखमी झाले होते.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, रंगराव बावचकर हे कामधेनू दूध संस्थेत दूध घालण्यासाठी जाताना त्यांना वाटेत अडवून तुकाराम बाऊचकर याने वाद घातला. त्यानंतर तुकारामसह त्यांच्या कुटुंबातील इतरांनी त्यांच्यावर काठी, तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचा मुलगा कृष्णात आणि भाऊ रामचंद्र घटनास्थळी आले. त्यांच्यावरही सशस्त्र हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी ११ साक्षीदार तपासले. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी, पंचांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून शिक्षा ठोठावली.
फोटो नं. १००२२०२१-कोल-बच्चेसावर्डे (आरोपी)
ओळ :
बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा) येथे आठ वर्षांपूर्वी जमिनीच्या हद्दीच्या वादातून झालेल्या सशस्त्र हल्ल्याप्रकरणी जिल्हा व सत्रन्यायालयाने बुधवारी बाऊचकर कुटुंबियातील नऊजणांना शिक्षा सुनावली.