कोल्हापूर : पंचगंगा नदीत मासे पकडणाऱ्याच्या गळाला वृद्धाचा मृतदेह अडकल्याने त्याने हा गळाचा दोरा काठावरील दगडाला गुंडाळून धूम ठोकली. पाण्यात बुडून मृत झालेला वृद्ध हा कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तुकाराम रामू बोटे (वय ६२, रा. २७१०, बी वॉर्ड, मंडलिक गल्ली) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी (दि. १४) रागाच्या भरात घरातून निघून गेल्यापासून बेपत्ता होते. घटनास्थळावरील परिस्थितीवरून मृत्यूबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते; पण सायंकाळी शवविच्छेदन अहवालात त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
बुधवारी सकाळी शिवाजी पुलावर महापालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील हे विनामास्क नागरिकांवर कारवाई करीत होते. दशपिंड क्रियासाठी आलेल्या युवकाने नदीत मृतदेह तरंगत असल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस व अग्निशमन दलास कळवले. मृतदेहाच्या शर्टच्या कॉलरला गळ अडकवून त्याचा दोरा नदीकाठावर दगडाला अडकवला होता. करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर यांनी पाहणी केली.
दरम्यान, तुकाराम बोटे हे बेपत्ता असल्याची तक्रार मंगळवारी जुना राजवाडा पोलिसांत नोंद होती. बोटेंच्या नातेवाइकांनी मृतदेह ओळखला. मृत बोटे हे सोमवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. त्यांच्याजवळ सुमारे १५ हजार रुपये असल्याचे त्यांच्या मुलाने पोलिसांना सांगितले. बोटे हे पाटबंधारे विभागातील निवृत्त उपअभियंता होते.
मासे पकडणारा गायब
रात्रीच्या वेळी मासे पकडणाऱ्याच्या गळाला हा मृतदेह लागला. त्याने तो मोठा मासा असावा अशा उद्देशाने काठावर ओढला; पण मृतदेह पाहून अंगलट येऊ नये म्हणून गळाचा दोर दगडाला बांधून त्याने धूम ठोकली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
फोटो नं. १६१२२०२०-कोल- तुकाराम बोटे(पंचगंगा नदी)
फोटो नं. १६१२२०२०-कोल- पंचगंगा नदी
ओळ : कोल्हापुरातील पंचगंगा नदीत शिवाजी पुलानजीक दशपिंड क्रिया घाटाजवळ वृद्धाचा मृतदेह बुधवारी पाण्यावर तरंगताना मिळाला. त्याची पाहणी करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर व पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी केली.
(तानाजी)