: निपाणीत स्मृतिदिनी स्मृती ग्रंथ प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
निपाणी : दिवंगत सामाजिक कार्यकर्ते मोहन बुडके यांनी निपाणी शहरात होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात आपले योगदान दिले आहे. तंबाखू, विडी कामगार, देवदासी यासह अन्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आयुष्यभर काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांनी नेहमीच पक्षभेद जातपात हे बाजूला ठेवून वंचित शोषित घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला.
मोहन बुडके यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व हे अपवादानेच पाहायला मिळते. निपाणीच्या इतिहासात त्यांचे नाव सोनेरी अक्षरांनी लिहिले जाईल, असे मत माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी यांनी व्यक्त केले.
निपाणी येथील महादेव मंदिर सभागृहात बुडके यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
मान्यवरांच्या हस्ते बुडके यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर त्यांच्या कार्यावर आधारित स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. प्रा. अच्युत माने यांनी प्रास्ताविक केले.
माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले की, बुडके सरांचा आणि आमचा परिचय 1975 पासून होता. त्यांच्या घरी कितीतरी वेळा मी राहिलो असून, त्यांच्या घरी जेवण केले आहे. वडीलधाऱ्या भूमिकेतून त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले व प्रसंगी दरडावले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू.
माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले की, बुडके सर आमच्या पक्षात काम करत असले तरी वैचारिक मुद्द्यावर त्यांचे आमचे नेहमी मतभेद होत होते; पण त्यांनी ते मतभेद कधीही वैयक्तिक आयुष्यात येऊ दिले नाहीत. खांद्याला खांदा लावून लढणारे ते सच्चे नेते होते.
कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, बुडके सर व डी.वाय. पाटील घराण्याचे कौटुंबिक सबंध होते. त्यांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्यांचे विचार हे आयुष्यभर सोबत राहणार आहेत.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, युवा नेते उत्तम पाटील यांनी बुडके सरांच्या आठवणी सांगून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांच्या विचारांचे पालन करणे ही त्यांना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सुकुमार पाटील, अरुण शिंत्रे, महेश जाधव, सुनील पाटील, रंगराव यादव, महेश जाधव, अजित मकानदार, अजितदादा पाटील, ॲॅड. अशोक रणदिवे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. सुरेश कांबळे यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राजेश कदम, विलास गाडीवडर, माजी नगराध्यक्ष प्रवीण भाटले, निकू पाटील, रोहन साळवे, दादाराजे देसाई, बाळासाहेब देसाई, संजय सांगावकर, राजू पाटील यांच्यासह नगरसेवक, महिला मान्यवरांची उपस्थिती ीहोती. अस्लम शिकलगार यांनी आभार मानले.
फोटो
निपाणी : मोहन बुडके यांच्या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.