कोल्हापूर : परिक्षेत्रात कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण हे विकसनशील जिल्हे येतात. वाढते औद्योगीकरण, बांधकाम क्षेत्र, जमिनींचा वाढता भाव यांमुळे विकासाबरोबरच वर्चस्ववादामुळे संघटित गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ थोपविणे भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याने खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, सावकारीसारखे गंभीर व सामाजिक गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.परिक्षेत्रात गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार घेऊन गुन्हे दाखल केले जात आहेत. कोणत्याही गुन्ह्यामध्ये तक्रार टाळाटाळ किंवा परस्पर मिटविण्याचा प्रयत्न करू नका, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
गुन्ह्यांची संख्या वाढती असली तरी त्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे कमी करण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी परिक्षेत्रातून १३२ सराईत गुन्हेगारी टोळ्यांतील ८३० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच कलम ५७ नुसार परिक्षेत्रातील ५४ गुन्हेगारांवर न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाली आहे. त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
न्यायालयीन कामकाजावेळी जे आरोपी हजर राहत नाहीत, अशा ४३३ आरोपींना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरोडे, चोरी गुन्ह्यातील ४४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ‘निर्भया’ पथकाद्वारे परिक्षेत्रात ६७ हजार २३९ कारवाया केल्या असून ११९ गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे ६५ हजार ४१० तरुणांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
२१२ फरार व १४८४ पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यात आले आहे. मटका, जुगारामध्ये ८४६८ खटले दाखल करून १७८९ आरोपींवर कारवाई केली आहे. १५ कोटी २५ लाख १९ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदीमध्ये २० हजार ४९३ खटले दाखल करून १७ हजार ६१० आरोपींवर कारवाई केली आहे.
१९ कोटी ६३ लाख १० हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खासगी सावकारीमध्ये २५४ गुन्हे दाखल करून ५८२ आरोपींवर कारवाई केल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.जिल्हावार मोक्का कारवाईकोल्हापूर-२०, सांगली- ८, सातारा-१९, सोलापूर ग्रामीण-१२, पुणे ग्रामीण-४१