कोपार्डे - स्त्रीमधील मातृत्व, मग ती कोणत्याही आघाडीवर काम करणारी असू दे, मायेचा पाझर देणारच, अशीच घटना पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकपदी काम करणाऱ्या कोल्हापूरच्या मधुरा दिंडे-कोराणे यांच्याबाबतीत घडली. कोल्हापूरच्या मातृत्वाचा ओलावा मिळाल्याने एका नवजात मुलाला जग अनुभवण्याची संधी मिळाली आणि या मातेच्या ममत्वाला सोशल मीडियानेही सलाम केला.
एरवी पोलिसांकडे एक खाकी वर्दीला रागीट, तापट स्वभाव, अशा नजरेतून पाहिले जाते. मात्र पुणे येथील कात्रज घाटातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिलेल्या एक दिवसाच्या नवजात अर्भकाला जीवदान देण्याच्या घटनेतून पुढे आलेल्या सहायक पोलीस निरीक्षक मधुरा दिंडे - कोराणे या कोल्हापूरच्या कन्येच्या खाकी वर्दीतील मातृत्वाच्या ओलाव्याने सर्वांनाच भारावून टाकले आहे.
पुणे येथे सेवा बजावणाऱ्या स.पो.नि. मधुरा दिंडे - कोराणे यांचे माहेर फुलेवाडी, तर बहिरेश्वर सासर आहे. मधुरा दिंडे - कोराणे या पुणे येथे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या नाईट ड्युटीवर असताना कात्रज घाटात रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याची माहिती पहाटे पाच - सहाच्या सुमारास मिळताच, क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपल्या सहकाऱ्याला घेऊन दुचाकीवरून घटनास्थळी धाव घेतली. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात अर्भक रडत असताना दिसताच काही सेकंदात त्यांनी त्या बाळाला आपल्या जवळ घेतले व सहकाऱ्यासोबत दुचाकीवर बसून थेट ससून रुग्णालय गाठले. मधुरा दिंडे - कोराणे यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेमुळे वेळेत या बाळावर उपचार झाल्यामुळे त्या बाळाचा जीव वाचला.
दिंडे - कोराणे या ढिगाऱ्यातून बाळाला उचलून घेऊन दुचाकीवरून जातानाचा व्हिडीओ प्रत्यक्षदर्शी लोकांनी चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. खाकी वर्दीतील ममत्वाचे, माणुसकीच्या ओलाव्याचे हे दर्शन पाहून दिंडे - कोराणे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊन त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
२६ कोपार्डे मधुरा दिंडे
फोटो --
कचऱ्याच्या ढिगात पडलेल्या नवजात अर्भकाला जवळ घेऊन थेट ससून रुग्णालयात दाखल करताना मधुरा दिंडे- कोराणे.