कोल्हापूर : कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरू असल्याने मोकाट जनावरे, कुत्र्यांची अन्नाअभावी उपासमार सुरू झाली आहे; पण तेदेखील जीव आहेत, त्यांनादेखील भाव-भावना आहेत, जगण्याचा अधिकार आहे, याच भूतदयेतून आणि प्राणीजीवनावरील प्रेमभावनेतून कोल्हापुरातील वृक्षप्रेमी संस्था आणि प्राणी कल्याण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मोकाट जनावरे, गाई, भटकी कुत्री यांना अन्नपुरवठा करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या ४ दिवसांपासून सुरू झालेला हा उपक्रम शहरात ४० ठिकाणी सुरू असून लॉकडाऊन संपेपर्यंत हे काम सुरूच राहणार आहे.
या प्राण्यांसाठी किमान पोट भरेल अशा पद्धतीने चपाती, टाकाऊ चिकन मिक्स असा भात, बिस्किटे असे अन्न वाढले जात आहे. वृक्षप्रेमी संस्था आणि प्राणी कल्याण संस्थेचे कार्यकर्ते यासाठी अन्न गोळा करून ते निश्चित केलेल्या ठिकाणी नेऊन ठेवत आहेत. किमान एकवेळची तरी भूक भागेल आणि हे प्राणी हिंस्त्र हाेण्यापासून वाचतील, अशी यामागची भूमिका आहे. एकट्या संस्थेला या कामात मर्यादा येत असल्याने या मुक्या प्राण्यांची भूक भागवण्यासाठी नागरिकांनी आपल्या आसपासच्या या जनावरांना घरातील शिल्लक राहिलेले अन्न देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात अमोल बुड्ढे, कौशिक मोदी, अक्षय कांबळे, मल्हार जाधव, विकास कोंडेकर, प्रसाद भोपळे, प्रमोद गुरव, शैलेश पोवार, अमर पवार हे सक्रियपणे सहभाग घेत आहेत.
फोटो: २३०४२०२१-कोल-डॉग
फोटो ओळ : लॉकडाऊन काळात सर्व व्यवहार बंद असल्याने मुक्या प्राण्यांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ लागली आहे. त्यांची उपासमार टाळण्यासाठी वृक्षप्रेमी संस्था आणि प्राणी कल्याण संस्थेने पुढाकार घेऊन रस्त्यावरच्या कुत्र्यांना अन्न देण्याचे काम सुरू केले आहे.