कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीणमध्ये वर्षभरात १८ टोळ्यांतील १५७ गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अवैध अग्निशस्त्रे, बनावट नोटा, आदी रॅकेटही उघडकीस आणून परिक्षेत्रातील गुन्हेगारीला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.कोल्हापूर परिक्षेत्रात १८ टोळ्यांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाईचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी १५७ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ प्रमाणे मोक्का कारवाई करण्यात आली. मोक्काअंतर्गत कारवाईमध्ये पुणे ग्रामीणचे काम उल्लेखनीय आहे. त्यांनी १३ टोळ्यांचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यामध्ये १११ गुन्हेगारांविरुद्ध मोक्का लावण्यात आला. मध्य प्रदेशातील आंतरराज्य टोळीतील सोबन ऊर्फ गांडो हिमला मछर याच्यासह १४ गुंडांच्या विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सासवड येथील पप्पू उत्तरेकर टोळीतील १५ आरोपी, जेजुरी येथील महेश कमलापुरे टोळीतील १२, लोणीकाळभोर येथील तुषार हंबीर टोळीतील १२, पौंड येथील तुषार गोगावले टोळीतील ६, सांगली येथील महंमद जमाल नदाफ टोळीतील २०, कऱ्हाड शहर टोळीतील सलीम ऊर्फ सल्ल्या चेप्या महंमद शेख याच्या टोळीतील ८ गुन्हेगारांचा मोक्काअंतर्गत कारवाईत सहभाग आहे. अवैध अग्निशस्त्रे मोठ्या प्रमाणात हस्तगत केली आहेत. १०३ अग्निशस्त्रे व ३२१ काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. सांगली जिल्ह्यात बनावट नोटाअंतर्गत सुमारे ४० लाख रुपये जप्त करून अकरा आरोपींना अटक करण्यात आली. परिक्षेत्रात १७८ दरोड्यांचे गुन्हे उघडकीस आणले. अलीकडच्या काळात गुन्हे दोषसिद्ध होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर परिक्षेत्रात १५७ गुन्हेगारांना मोक्का
By admin | Published: April 20, 2016 12:12 AM