पेठ वडगाव : तळसंदे (ता. हातकणंगले ) येथे आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका दाढीवाले काकावर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी संध्याकाळी अल्पवयीन मुलगी दूध आणण्यासाठी गेली असताना हा प्रकार घडला.
संजय संभाजी पाटील (रा. तळसंदे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत फिर्याद मुलींच्या आईने दिली. तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील करीत आहेत.
पोलिसातून मिळालेली माहितीनुसार तळसंदे येथे मुलगी किराणा व दूध आणण्यासाठी एकटी गेली होती. यावेळी तिच्या परिचयाच्या दाढीवाले काकांनी रात्री साडेसातच्या सुमारास मुलीसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केल्याचे नातेवाइकांना सांगितले. पीडित मुलीने संबंधित गैरवर्तन केलेली जागा व व्यक्ती दाखवली. सशंयितास याबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नातेवाइकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.