इचलकरंजी : येथील एका अल्पवयीन मुलीला इंस्टाग्रामवरून चॅटिंग करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला एका समाजातील वेगळ्या पद्धतीनुसार तोंडाला स्टोल बांधायला लावून तिचे फोटो काढले. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. साद मुजावर (वय २१, रा. आभार फाटा, चंदूर), असे त्याचे नाव आहे.
याबाबत पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना समजताच शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली होती. याबाबत पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिलेली माहिती अशी, साद मुजावर हा शहरातील एका खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानात कामाला आहे.डिसेंबर २०२२ मध्ये त्याने इंस्टाग्रामवरून चॅटिंग करून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, रिलेशनशिपमध्ये राहूया, असे सांगून वेळोवेळी शहरातील कॉफी शॉपमध्ये नेले व तिच्याशी लगट करून तिला तोंडाला स्टोल बांधायला लावून तिचे फोटो काढले. त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत पीडित मुलीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.पोलिसांनी साद मुजावर याच्यावर अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम, तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम विनयभंग आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती कळताच शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी हटवून आभार फाटा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.