कोल्हापूर : येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि. २६) आयोजित रिक्षा सौंदर्य स्पर्धेत इम्तियाज मोमीन (कोल्हापूर, रिक्षा क्र. : एमएच ०९-सीडब्ल्यू-९४५९) यांनी प्रथम क्रमांक पटकावत ‘कोल्हापूर रिक्षा सुंदरी’ हा किताब मिळविला. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्टÑ व सीमाभागातील ४० हून अधिक आकर्षक सजावट केलेल्या रिक्षांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.निवृत्ती चौक रिक्षा मित्रमंडळातर्फे शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात ‘राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य’ स्पर्धेचे आयोजन केले होते. सकाळी अकराच्या सुमारास स्पर्धेचे उद्घाटन राजेंद्र जाधव, चंद्रकांत भोसले, वसंत पाटील, आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेच्या विविध फेऱ्या झाल्यानंतर परीक्षकांनी निकाल घोषित केला. त्यात ‘कोल्हापूर रिक्षा सुंदरी’ हा किताब कोल्हापूरचे रिक्षाचालक इम्तियाज मोमीन यांनी मिळवत चांदीचे पदक पटकाविले. त्याचबरोबर ‘अ’ गटातही इम्तियाज मोमीन यांनी प्रथम क्रमांक घेत ११ हजारांचे बक्षीस मिळविले. द्वितीय क्रमांकाचे नऊ हजारांचे बक्षीस एम. एम. शेख (बेळगाव, रिक्षा क्र. केए २२ सी-८६०३) यांनी, तृतीय क्रमांकाचे सात हजारांचे बक्षीस मुस्ताक पठाण (केए २२-सी-६२९८) यांनी, उत्तेजनार्थ पाच हजारांचे बक्षीस अविनाश दिंडे (कोेल्हापूर, एमएच ०९-सी डब्ल्यू २७२५) यांनी पटकाविले.‘ब’ गटात नौशाद सुळकट्टी (बेळगाव, रिक्षा क्र. केए २२-बी-५९९३) यांनी प्रथम क्रमांक घेत ११ हजारांचे बक्षीस मिळविले. द्वितीय क्रमांकाचे नऊ हजारांचे बक्षीस इस्माईल शेख (पुणे, रिक्षा क्र. एमएच १२-एफ ९८२५) यांनी, तृतीय क्रमांकाचे सात हजारांचे बक्षीस शहाब मरियाळकर (बेळगाव, केए २२-बी-४९७५) यांनी, उत्तेजनार्थ पाच हजारांचे बक्षीस कृष्णा मारणे (पुणे, एमएच १२ एएच ०८८९) यांनी पटकाविले.सायंकाळी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, प. महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, मोहन बागडी, आदींच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना बक्षीस वितरण केले.
‘कोल्हापूर रिक्षा सुंदरी’चे मोमीन मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:53 AM