कोल्हापूर : खासगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन त्यांचे समायोजन अन्य शाळेत होईपर्यंत त्याच शाळेतून देण्याचे शासनाचे आदेश असतानाही, शालार्थ वेतनप्रणालीमध्ये वेतन काढण्याची सोय नसल्याच्या कारणावरून शिक्षण विभागाने मार्च २०१४ मध्ये बेमुदत कालावधीकरिता वेतन रोखलेले आहे. या निर्णयाविरोधात सोमवार (दि. १२) रोजी महाराष्ट्र राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे सकाळी ‘भीख मांगो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष संतोष आयरे यानी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, खासगी प्राथमिक शाळेतील आठ शिक्षक, पाच लिपिक व सात शिपाई यांचे वेतन मार्च २०१४ पासून रोखलेले असल्याने, सदर अतिरिक्त कर्मचार्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.या गोष्टीकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने ‘भीख मांगो’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर आंदोलनातून जमा होणारी रोख रक्कम शिक्षण उपसंचालक यांच्याकडून सुनील मगर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. सर्व खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी या अभिनव आंदोलनासाठी भवानी मंडप येथे सकाळी १० वाजता जमावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवारी ‘भीख मांगो’आंदोलन शिक्षकांचे प्रश्न : संतोष आयरे यांची माहिती
By admin | Published: May 11, 2014 12:23 AM