कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे सोमवार (दि. १४) चा आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. आता ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पूर्वनियोजनानुसार सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रक्रिया घेण्यात येणार होती. त्यासाठीचे नियोजनही पूर्ण करण्यात आले हाेते. मात्र मंगळवारपासून ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे संध्याकाळी हा आरक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले. ज्या जिल्ह्यात ही प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही, त्या ठिकाणची ही प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, आता ती जानेवारी २०२१ मध्येच होण्याची शक्यता आहे.
चौकट
आरक्षण नसल्यामुळे संभ्रमावस्था
ग्रामपंचायत निवडणुकीच्या आधी जर आरक्षण प्रक्रिया पडली असती तर गावचा सरपंच खुल्या की आरक्षित गटातील होणार हे आधीच स्पष्ट झाले असते. अनेकदा सरपंचपद डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीची रणनीती आखण्यात येते. एखादा अगदीच मातब्बर नेता निवडणुकीत उतरला तर निवडणूक पूर्ण किंवा अंशत: बिनविरोध केली जाते; परंतु आता आरक्षण नंतर पडणार असल्याने संभ्रमावस्थेतच निवडणुकीचे नियोजन करावे लागणार आहे.