कोल्हापूर : मंत्र्यांची दालने आलिशान करण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे आहेत, मग महापुराने उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठीच सरकारच्या तिजोरीत खडखडाट कसा? असा सवाल करत आंदोलनाबाबत मला संयमाचा सल्ला देण्यापेक्षा मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी मदतीसाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न करावेत, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.
पूरग्रस्तांना २०१९ प्रमाणे नुकसानभरपाई मिळावी, नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान द्यावे यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जलसमाधी आंदोलनास कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयाग संगमावरील दत्त मंदिरात अभिषेक घालून बुधवारी पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पूरग्रस्तांना मदतीसाठी हात आखडता घेणाऱ्या राज्य व केंद्र सरकारवर राजू शेट्टी यांनी जोरदार आसूड ओढले. शेट्टी म्हणाले, दोन्ही सरकारच्या भोंगळ कारभारामुळे मदत मिळत नाही. गुजरातला नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर एक हजार कोटी तातडीने मिळतात. मग कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील पूरग्रस्तांची उपेक्षा का? सरकारने जर आमची दखल घेतली नाही तर ज्या पुरामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो त्याच पाण्यामध्ये आम्ही जलसमाधी घेऊन आमचे जीवन संपवणार आहोत.
ही पदयात्रा, पंचगंगा काठावरून पूरग्रस्त गावातून ५ सप्टेंबरला शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे पोहोचेल. मागण्या मान्य न झाल्यास तेथेच हजारो शेतकऱ्यांसह शेट्टी जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
चौकट
गावोगावी पदयात्रेचे स्वागत
पूरग्रस्तांची नुकसानभरपाई देण्यात दिरंगाई होत असल्यामुळे पदयात्रेत पूरग्रस्त, शेतकऱ्यांची गर्दी झाली होती. उत्साही प्रचंड दिसत होता. प्रयाग चिखलीपासून निघालेल्या पदयात्रेचे वाटेत दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांनी स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले.