जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यातील ज्या गाव, वस्तीमध्ये अथवा वाड्यांमध्ये घरापासून एक किलोमीटरपर्यंत शाळा नसल्यास आणि इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत तीन किलोमीटरपर्यंत शाळा नसल्यास दरमहा वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. प्रतिविद्यार्थी दरमहा तीनशे रुपये असा भत्ता आहे. या भत्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीचे एकूण ८०६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यात ग्रामीण क्षेत्रातील ६६३ आणि शहरी क्षेत्रातील १४३ विद्यार्थी आहेत. त्यांना एकूण ४,८३६०० रुपये भत्ता वितरित केला जाणार आहे. या भत्त्यासाठी जिल्ह्यात २९४ इतके सर्वाधिक विद्यार्थी हे राधानगरी तालुक्यातील आहेत.
पॉईंटर्स
प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिमाह : ३०० रुपये
जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थी : ८०६
तालुकानिहाय लाभार्थी
आजरा : ३०
भुदरगड :४७
चंदगड :८५
गडहिंग्लज : १६
गगनबावडा :६४
हातकणंगले : २८
कागल :१६
करवीर :१८
राधानगरी : २९४
शाहूवाडी : ३८
शिरोळ : ४३
कोल्हापूर शहर : १२७
प्रतिक्रिया
शासन आदेशानुसार या विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधेसाठी भत्ता देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे. प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर या भत्त्याचे वितरण करण्यात येईल.
- आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी.
चौकट
फेब्रुवारी, मार्चचा भत्ता
या भत्त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची शाळेमध्ये ५० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. शाळा सुरू असल्यास आणि नियमानुसार उपस्थिती असेल, तरच निधी देण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळांतील ऑफलाईन वर्ग दि. २७ जानेवारीपासून सुरू झाले. त्यानंतर मार्चपर्यंत शाळा सुरू राहिल्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी, मार्चचा भत्ता दिला जाणार आहे. वर्ग भरल्याने आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याने या दोन महिन्यांचा भत्ता देण्यात कोल्हापूर जिल्ह्यात कोणतीही अडचण नाही.