: बागलिगे येथे सरपंच निवडीनिमित्त विकास कामाचा शुभारंभ
चंदगड : गावाचा एकोपा गावाच्या विकासाला चालना देत असतो. यासाठी गावात राजकारणविरहित कारभार केल्यास गावाचा विकास व्हायला जास्त वेळ लागत नाही, असे मत दौलत अथर्वचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले. बागिलगे ता. चंदगड येथील सरपंच निवडीनिमित आयोजित विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच नरसू पाटील होते.
प्रारंभी प्रास्ताविक राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांनी, गट-तट बाजूला ठेवून गावाचा विकास साधण्याबरोबरच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गावात अधिकारी निर्माण करणार असल्याचे सांगितले.
श्री. खोराटे पुढे म्हणाले, गावाच्या विकासात ग्रामपंचायतींचे योगदान महत्त्वाचे असून ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी विकासाचा ध्यास घेतल्यास गावात नंदनवन फुलण्यास जास्त वेळ लागणार नाही.
यावेळी जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांनी, बागिलगेच्या विकासासाठी जिल्हा परिषद फंडातून जितका निधी देता येईल तितका देण्याचा आपण प्रयत्न करू. उच्चशिक्षित अधिकाऱ्यांचा उपयोग गावाने गावाच्या विकासासाठी करून घ्यावा, असे मत व्यक्त केले.
राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांनी, गावाच्या वाचनालयासाठी वीस हजार रुपये किमतीची स्पर्धा परीक्षेची पुस्तके दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.
व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्या विद्याताई विलास पाटील, माजी सभापती शांतारामबापू पाटील, उपसरपंच अनुसया पाटील, एस. के. पाटील, एस. एस. आवडण, पुंडलिक भोगण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन दयानंद पाटील यांनी केले, तर आभार गणपत पाटील यांनी मानले.