लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनला काही जोर लागत नाही. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार शनिवारी महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला मात्र गेली चार दिवस कोल्हापुरात कडकडीत ऊन आहे.
यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होईल, असे हवामान विभागाने सांगितले होते. त्यानुसार ५ जून रोजी महाराष्ट्रात सक्रिय झाला. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप सक्रिय झालेला नाही. मंगळवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात दिवसभर जोरदार पाऊस झाल्याने रात्रीपासून कोल्हापुरातील हवामानात फरक पडला आहे. गार वाऱ्यांसह काहीशी थंडी जाणवते. बुधवारी सकाळीही ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची भुरभुर सुरू होती. त्यामुळे मान्सून सक्रिय होईल, असे वाटत होते. मात्र त्याला जोर लागत नाही. सकाळी नऊनंतर पुन्हा आकाश स्वच्छ झाले आणि कडक ऊन पडले. दिवसभरात अधूनमधून आकाशात ढगांची दाटी व्हायची मात्र पुन्हा आकाश स्वच्छ व्हायचे. सायंकाळी मात्र वातावरणात काहीसा गारवा जाणवत होता. आज, गुरुवारी जिल्ह्यात पाऊस होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कमाल तापमानात घट झाली असली तरी किमान तापमान २४ डिग्रीपर्यंत असल्याने अजूनही उष्मा जाणवताे.