कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मान्सूनचे आगमन दबकतच झाले. सकाळपासून ढगाळ वातावरणासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. शनिवारपासून तो सक्रिय होईल, असा अंदाज आहे.यंदा मान्सून वेळेत दाखल होणार, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मान्सूनचा यंदाचा प्रवास सुरूही होऊन तो १ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला. तो केरळमध्ये आल्यानंतर साधारणत: आठवड्यात महाराष्ट्रात सक्रिय होतो. मात्र मध्यंतरी ह्यनिसर्गह्ण चक्रीवादळाने मान्सून काही काळ तिथेच रेंगाळला.
वादळाचा प्रभाव ओसरल्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक व्यापून तो महाराष्ट्राकडे सरकू लागला. गुरुवारी त्याने महाराष्ट्रातील अनेक भागांत हजेरी लावली. या दिवशी दुपारपासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरणात बदल होत जाऊन ढगाळ वातावरणासह पावसाची भुरभुर सुरू झाली. शुक्रवारी सकाळपासून अधूनमधून पावसाची रिपरिप राहिली. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण असाच अनुभव कोल्हापूरकरांना आला. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ११ मिलिमीटर झाला.धूळवाफ झालेल्या खरिपाची उगवण चांगली झाली असून सध्या त्याच्या आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत. भाताची कोळपण व खुरपणीचे काम जोरात सुरू आहे. मान्सूनही सक्रिय झाल्याने वाफशावर खुरपणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.तालुकानिहाय २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा
- पन्हाळा ( २.४३)
- शाहूवाडी (६.५०)
- राधानगरी (१.०)
- गगनबावडा (११.०)
- गडहिंग्लज (०.५७)
- भुदरगड (०.६०)
- चंदगड (५.०).