कोल्हापूर : जिल्ह्यात सकाळपासून पावसाने सुरुवात केली. पावसाची रिपरिप आणि गार वारे पाहता मान्सूनची चाहूल लागली असून, कोणत्याही क्षणी मान्सून सक्रिय होईल, असे वातावरण तयार झाले आहे. दुपारी चारनंतर एकसारखा पाऊस सुरू राहिला.मंगळवारी रात्रीपासून पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.
रात्रीही जोरदार पाऊस कोसळला. सकाळपासून ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. सकाळी नऊ वाजल्यापासून अकरापर्यंत पाऊस राहिला. दुपारी काहीकाळ उघडीप राहिली; पण चारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. तब्बल तीन तास पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. सायंकाळी साडेसहानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला.मान्सूनसारखे हवामान तयार झाले असून गार वारे व पावसाच्या सरीने मान्सूनची चाहूल लागली आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५४.१४ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावड्यात २६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत चांगला पाऊस झाला. धरणक्षेत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. राधानगरी धरणक्षेत्रात २६, तर पाटगाव ६६ व कोदे धरणक्षेत्रांत ६२ मिलिमीटर पाऊस झाला. आज, गुरुवारीही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
भुईमूग पेरणीला गतीपावसाअभावी खोळंबलेल्या भुईमूग व कडधान्यांच्या पेरणीला आता गती आली आहे. पेरणीयोग्य पाऊस असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.‘मृग’ शेवटी बरसणार?यंदा ८ जून रोजी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला; पण सुरुवातीच्या टप्प्यात त्याने हुलकावणी दिली. शनिवारी (दि. २२) रोजी सूर्य ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे मृग नक्षत्राचे दोनच दिवस राहिले असून, या दिवसांत पाऊस चांगला लागण्याचा अंदाज आहे.