लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. ‘ला निना’मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते व सप्टेंबरमध्ये त्याचा परतीचा प्रवास सुरू हाेतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. ३.५ ट्रिलियन रुपयांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मान्सूनमुळे भारताचे ७० टक्के जलसाठे भरले जातात. सिंचनाशिवाय, देशातील जवळपास निम्मी शेतजमीन जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते.
‘ला निना’मुळे भारतात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीही ‘ला निना’मुळे मान्सून परतण्यास उशीर झाला होत, असेही ते म्हणाले.
- सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सोयाबीन, मका, भात, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार. - जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पुराने थैमान घातले. पाऊस कमी झाला तरी बडाेदा येथे पूरस्थिती कायम आहे. बडाेद्यात चिमुकल्याला सुरक्षित ठिकाणी नेताना लष्कराचा जवान.
सरासरीपेक्षा जास्त पाऊसभारतात यावर्षी सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के जास्त पाऊस पडला आहे. काही राज्यांत तर सरासरीपेक्षा ६६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.
पिकांच्या पेरणीवर परिणामखरीपाची काढणी साधारणपणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून केली जाते. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे काढणीस आलेल्या भात, सोयाबीन मका आणि कडधान्यासारख्या पिकांचे नुकसान होऊ शकते. याचवेळी या पावसाने जमिनीतील ओलावा वाढून त्याचा फायदा गहू, शाळू, हरभरा यासारख्या रब्बी पिकांच्या लागवडीत वाढ होण्यात होऊ शकतो.
गुजरातमध्ये पूरपरिस्थिती कायमअहमदाबाद : गुजरातमधील पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी परिस्थिती सुधारली. परंतु, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती मात्र कायम आहे. त्यातही वडोदरा आणि आणखी काही शहरांत पूरपरिस्थिती कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी फोनवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. मागील तीन दिवसांत राज्यामध्ये पावसाशी संबंधित दुर्घटनांत २६ जणांचा मृत्यू झाला.