कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षीपासून जेवढे कोरोना पॉझिटिव्ह आले त्यापैकी ४४ टक्के म्हणजेच ५० हजार ६७ रुग्ण एका सरलेल्या मे महिन्यात नोंदवण्यात आले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक २० हजार ६३२ रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यांच्या अडीचपट मे महिन्यात पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १३ हजार २६९ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च २०२१ या तीन महिन्यांत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. मात्र एप्रिलपासून रुग्णवाढीला सुरुवात झाली. सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदीसाठी होणारी प्रचंड गर्दी, हेच नागरिक दिवसभरात घरात थांबणे, ‘गाेकूळ’ निवडणूक, कडक लाॅकडाऊनबाबतचे धरसोड धाेरण, गृह अलगीकरण आणि जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी गेल्या वर्षी या तुलनेत घेतलेली बचावात्मक भूमिका या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून मे महिन्यामध्ये रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात येते.
केवळ रुग्णसंख्या नव्हे तर एप्रिल आणि मे महिन्यात मृत्यूचाही आकडा असाच वाढत राहिला आहे. मे महिन्यामध्ये चार दिवस रुग्णसंख्या ही दोन हजाराच्या वर गेली आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या ही २५ मे रोजी २ हजार ८९८ इतकी झाली. तर १६ दिवस रुग्णसंख्या १५०० च्या वर आहे. संपूर्ण मे महिन्यात केवळ एकच दिवस म्हणजे ३ मे रोजी सर्वात कमी रुग्णसंख्या म्हणजे ८८८ इतकी नोंदवण्यात आली आहे.
मे महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात ऑक्सिजनसाठी जी धावपळ करावी लागली ती दुसऱ्या पंधरवड्यात थोडी कमी झाली. रेमडेसिविर इंजक्शन्सची मागणी असताना पुरवठाही वाढला. या दिलासादायक बाबी असल्या तरी म्यूकरमायकोसिसचे रुग्णसंख्या १०० वर पोहोचली आहे, हे चिंताजनक आहे.
जिल्ह्यातील कोल्हापूर शहराबरोबरच करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात दैनंदिन रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या हा देखील प्रशासनाच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच आता जिल्हा आणि आरोग्य प्रशासनाने या तीन तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोल्हापूर महापालिकेनेही कठोरपणे संजीवनी अभियान राबवण्यास सुरूवात केली आहे. चाचण्या वाढवण्यात येत आहेत.
चौकट
नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज
आरोग्य विभाग आणि प्रशासन यांनी शक्य त्या गोष्टी केल्या आहेत. नवे ऑक्सिजन प्लांट उभारले जात आहेत. कोविड केअर सेंटर वाढवली जात आहेत. याला मर्यादा आहेत. नियोजनमधून औषधांसाठी निधी दिला जात आहे. रुग्णवाहिका, मोबाईल व्हॅन मंजूर केल्या जात आहेत. त्यामुळे केवळ शासन आणि प्रशासनाच्या नावाने बोटे मोडून काहीही होणार नाही. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु एकीकडे डॉक्टर्स, नर्स, सर्व आरोग्य कर्मचारी रात्रीचा दिवस करत असताना आता विनाकारण फिरायचे टाळून नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.