कोल्हापूर : सामान्य मायमाउली मुलांच्या तोंडावर मारून ‘गोकुळ’ला दूध घालतात, पण सर्वसामान्यांच्या पैशांतून संचालकांना दरमहा दोन लाखांचे पाकीट (इतर मलई व लोणी वेगळे) मिळते, असे पाकीट घेताना संजय घाटगेंची लाज कुठे जाते असा पलटवार आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी केला. भ्रष्टाचाराचा श्वासही घेत नाही म्हणणाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे ढोंग बंद करावे, अशी टीका आमदार मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली. हा मूळ वाद मुश्रीफ व संजय घाटगे यांच्यातील असताना मुश्रीफ यांनी ‘गोकुळ’च्या सरसकट संचालकांवर पाकिटाचा आरोप केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार आहे. विशेष म्हणजे याच मुश्रीफ यांनी पाठिंबा दिल्यामुळे सत्तारुढांना निवडून येणे सोपे झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या आरोपाला महत्त्व आले आहे.मुश्रीफ यांनी केलेली टीका अशी, कागल मतदारसंघातील सर्वधर्मीय गोरगरीब, सामान्य, श्रमिक, दलितांच्या पाठिंब्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत सलग चारवेळा संजय घाटगेंना चारीमुंड्या चित केले. १५ वर्षे मंत्री व २0 वर्षे आमदार म्हणून आपली कारकीर्द आदर्श झाली, कोणतेही ठोस पुरावे नसताना आपला द्वेष व बदनामी करण्याचे षङ्यंत्र घाटगे यांनी सुरू केले आहे. घाटगे यांना सत्ता अल्पकाळ मिळाली. भोळ्या-भाबड्या लोकांच्या भावनांचा चक्काचूर केला. त्यांनी काढलेले प्रकल्प, गोळा केलेले शेअर्स, घेतलेल्या जमिनी चौपट, पाचपट किमतींनी विकल्या. याबाबत आपण बोललो तर चौकशी करण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आहे. घाटगे विनाकारण बदनाम होऊ नयेत, या अग्निपरीक्षेतून बाहेर पडावेत म्हणून आपण ही जबाबदारी स्वीकारत आहे. अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेची जबाबदारीही आपल्याकडे द्यावी, म्हणजे घाटगेंच्या ७० ते ८० एकर जमिनीला पैसे न घेता पाणी कसे मिळते? हे कळले असते, असा टोलाही आमदार मुश्रीफ यांनी पत्रकातून हाणला. विधान परिषदेच्या निवडणुकीत चार मतांसाठी चार दुधाचे टँकर घेतले. कार्यकर्त्यांनी कर्ज काढून टॅँकर घेतले. या महाशयांनी ते टॅँकर जादा रकमा घेऊन दुसऱ्यास विकल्याने प्रामाणिक कार्यकर्त्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. ‘गोकुळ’मध्ये सामान्य माणसांच्या घामाचा पैसा आहे. त्यातून प्रत्येक संचालकाला महिन्याला दोन लाख रुपयांचे पाकीट (इतर मलई व लोणी वेगळे) मिळते. संजय घाटगे हे पाकीट न विसरता घेतात आणि आपण भ्रष्टाचाराचा श्वासही घेत नसल्याचा आव आणत असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. देर है लेकिन...!आपण सानेगुरुजी, महात्मा गांधी यांच्या मार्गाने चालणारा माणूस असल्याने कायदा हातात घेऊ शकत नाही. आपल्यावर कोणी बेछूट आरोप करीत असेल, तर न्यायालयामध्ये अबू्रनुकसानीचा दावा दाखल करणे एवढाच माझ्याकडे पर्याय आहे. देर है लेकिन अंधेर नहीं... न्यायदानासाठी वेळ लागेल. मात्र, न्याय मिळेलच यावर आपला विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
‘गोकुळ’च्या संचालकांना महिना दोन लाखांचे पाकीट
By admin | Published: April 27, 2016 11:58 PM