अनिल पाटील --- मुरगूड --सर्वसामान्य नागरिक फक्त गुन्हा घडल्यानंतरच पोलिस ठाण्यात न येता पोलिस आणि त्यांच्यातील सुसंवाद वाढावा यासाठी आता पोलिस ठाण्याचे मानांकन होणार आहे. यामध्ये टॉपला येण्यासाठी मुरगूड (ता. कागल) येथील पोलिसांची गेल्या महिन्यापासून जोरदार धडपड सुरू आहे. त्यामुळे मुरगूड पोलिस ठाणे कात टाकत असून, विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेतकोल्हापूर विभागाचे विशेष पोलिस निरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू केला असून, एखाद्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या कंपनीप्रमाणेच पोलिस ठाण्याची ओळख बदलण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. कारण पोलिस ठाण्यात फक्त गुन्हेगारच येतात, अशी सर्वसामान्य माणसांची मानसिकता झाल्याने पोलिसांपासून समाज कायमपणे थोडा लांबच राहिलेला दिसतो. अर्थात यासाठी आणि समाजाभिमुख काम करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळेल, अशा अनेक बाबींचा समावेश यामध्ये आहे.मुरगूड पोलिस ठाण्याशी कागल तालुक्यातील ५४ ते ५८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ या ठिकाणी दिसते. अर्थात पोलिस इमारतीमध्ये सर्वांनाच बसण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्टेशनसमोर सुंदर बाग करण्याचे काम सुरू असून, स्वागत कमान आणि आकर्षक प्रवेशद्वारसुद्धा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. मुख्य इमारतीच्या सभोवतालचा परिसर पेव्हिंग ब्लॉक घालून किंवा काँक्रिट टाकून दलदलविरहित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्य इमारतीच्या मागे रिकाम्या वेळेत पोलिसांचे मनोरंजन व्हावे, यासाठी व्हॉलिबॉलसह अन्य खेळांचे सुंदर क्रीडांगण करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. कोणीही इमारतीमध्ये प्रवेश केला की, त्याची अदबीने विचारपूस करण्यासाठी स्वागत कक्ष स्थापन केला जाणार आहे. याठिकाणी २४ तास कर्मचारी उपस्थित असणार आहे. यानंतर गुन्हेगारीच्या प्रकारावरून तपास करण्याचे विविध विभाग तयार केले असून, त्या विभागाची कागदपत्रे त्या त्या ठिकाणीच आकर्षक पद्धतीने ठेवण्यासाठी स्वतंत्र लाकडी पेट्या तयार केल्या आहेत. याशिवाय पोलिस ठाण्यामध्ये असणाऱ्या भौतिक सुविधांची तपासणी होणार आहे. त्यामध्ये स्वच्छतागृह आरोपींसाठी असणारी कोठडी, त्या ठिकाणची स्वच्छता, घडलेले गुन्हे, त्यांचा तपास करण्याची पद्धती, कर्मचाऱ्यांचा समाजाशी असणारा संबंध, अशा अनेक बाबतीत गुणांकन होऊन मानांकन दिले जाणार आहे.‘आयएसओ’ मानांकनासाठी सज्ज झालेली मुरगूड (ता. कागल) येथील पोलिस ठाण्याची इमारत.
मुरगूड पोलिसांची ‘आयएसओ’ मानांकनासाठी धडपड
By admin | Published: March 02, 2017 11:36 PM