इचलकरंजी : सांगली नाका ते टाकवडे वेस या मार्गावर मोपेडवरून जाणाऱ्या शेतकऱ्यास भरधाव ट्रॅक्टर-ट्रॉलीने जोराची धडक दिली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तात्यासाहेब अण्णासाहेब दानोळे (वय ५८, रा. यड्राव, ता. शिरोळ) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता घडला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तात्यासाहेब हे सहकारनगरकडून मोपेड (एमएच ०९ डीबी १७३७) वरून यड्राव येथील शेताकडे जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टर (एमएच १३ बीआर १२५८) ट्रॉली (०६३७ व ०६३८) ने तात्यासाहेब यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. तात्यासाहेब यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.