इचलकरंजी : गावभाग परिसरातील पूरग्रस्तांची घरे, जागा आहे तशी ठेवून सरकारने पूरग्रस्तांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करीत दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेने प्रांत कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला. तसेच याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.
निवेदनात, सन २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने आत्ताची राहती घरे व जागा ताब्यात न घेता त्यांना दुसरीकडे जागा उपलब्ध करून द्यावी. घरकुल बांधून द्यावे, सिलिंडर मोफत मिळावे. पूरग्रस्तांचे वीज बिल माफ करावे. घरफाळा व पाणीपट्टी माफ करावी. वरील सर्व मागण्या शासनाने लवकरात मान्य कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.
मोर्चामध्ये दिनेश माने, अनिल पाटील, सचिन कांबळे, वंदना कांबळे, सीमा कांबळे, शुभांगी विजापुरे, सुमन कांबळे, नंदा कुरणे, आदी सहभागी झाले होते.
फोटो ओळी
१७०८२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी प्रांत कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
छाया - उत्तम पाटील