कुरुंदवाड : शहरातील अतिक्रमण नियमितीकरणाची त्वरित अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी शहर बचाव कृती समितीच्या वतीने पालिकेवर अतिक्रमणधारकांचा मोर्चा काढण्यात आला. पालिकेच्या वतीने नगररचनाकार नितीन कदम यांनी निवेदन स्वीकारून अतिक्रमण नियमितीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व राजू आवळे व सुनील कुरुंदवाडे यांनी केले.
दरम्यान, अतिक्रमण नियमितीकरणाबाबत पंधरा दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास कृती समितीच्या वतीने अतिक्रमणधारकांना घेऊन नगराध्यक्षांच्या घरांवर मोर्चा काढण्यात येणार असून पालिका कामकाजही बंद पाडण्याचा इशारा दिला. शहरातील अतिक्रमण नियमितीकरण करण्यात लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन निष्क्रिय ठरल्याच्या निषेधार्थ या प्रक्रियेला गती मिळावी, या मागणीसाठी समितीच्या वतीने अतिक्रमणधारकांचा पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात अतिक्रमणधारक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पालिकेसमोर झालेल्या सभेत समितीचे राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, स्वाभिमानीचे आण्णासो चौगुले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अभय पाटुकले, अर्शद बागवान, विलास उगळे, आयुब पठाण, आप्पासो बंडगर यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधीविरोधात निष्क्रियतेचा ठपका ठेवत संताप व्यक्त केला. आंदोलनात काशिनाथ शिकलगार, मोनाप्पा चौगुले, राजमंमद गरगरे, बबलू पोवार, कृष्णा लोकरे, शिकंदर सारवान, रियाज शेख, शारदा शिकलगार, फुलाबाई मगदूम, पूनम डवरी, मंजूळा शिकलगार, अनिता शिकलगार यांच्यासह अतिक्रमण धारक सहभागी झाले होते. या वेळी पालिका चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
-----------------
पालिका प्रशासन आंदोलकांसोबत
दरम्यान, या प्रश्नावर पालिका सभागृहात मुख्याधिकारी निखिल जाधव व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पत्रकार बैठक घेतली. या वेळी अतिक्रमण नियमितीकरणाबाबत पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अतिक्रमणधारकांसोबत आहेत. आंदोलकांनी आंदोलन न करता चर्चेसाठी यावे. अतिक्रमण जागेतील आरक्षण फेरबदल करण्यासाठी पालिकेची ३० सप्टेंबर रोजी विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. त्यानंतर या प्रक्रियेला गती येणार आहे. या प्रक्रियेला वेळ लागत असला तरी कायद्याच्या चौकटीत राहून टिकावू निर्णय घेण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक प्रा. सुनील चव्हाण, उदय डांगे, अक्षय आलासे, पप्पू पाटील, शकील गरगरे उपस्थित होते.
फोटो - १५०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - कुरुंदवाड येथे मोर्चाचे निवेदन नगररचनाकार नितीन कदम यांनी स्वीकारले. या वेळी राजू आवळे, सुनील कुरुंदवाडे, आण्णासो चौगुले आदी उपस्थित होते.