हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले)चे उपनगराध्यक्ष तथा भाजपचे पक्ष प्रतोद भरत लठ्ठे यांनी राजकीय द्वेषातून स्वपक्षाच्याच तीन नगरसेविकांना अपात्र ठरविण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेत गुंतवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हा प्रकार २८जानेवारीपर्यंत थांबवावा. अन्यथा त्यांना खुर्चीचा व सत्तेचा चढलेला माज उतरविण्यासाठी त्यांच्या घरावर धडक मारून बांगड्यांचा आहेर देणार आहोत, असा इशारा भाजप नगरसेविका सुप्रिया पालकर, लक्ष्मी साळोखे व रुतुजा गोंधळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांना एक वर्षापूर्वी पदाची संधी दिली आहे. पक्षाच्याच इतर नगरसेवकांनाही पदाचा मानसन्मान मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते महावीर गाठ यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यानी त्यांच्याकडे राजीनामा मागितला होता. लठ्ठे यांनी राजीनामा देण्यास नकार देऊन विरोधकांशी संगनमत करून स्वपक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बंड उभारले आहे. परिणामी त्यांना उपनगराध्यक्ष व पक्ष प्रतोद या दोन्ही पदांवरून हकालपट्टी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परिणामी लठ्ठे यांनी स्वपक्षाच्याच सात नगरसेवकांपैकी नगरसेविका सुप्रिया पालकर,लक्ष्मी साळोखे व रुतुजा गोंधळी यांचे नगरसेवक पद अपात्र ठरविण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये पक्षांतर्गत बंडाळी मोठ्या प्रमाणात माजली आहे. या तीन नगरसेविकांनी नगराध्यक्षा जयश्री गाठ व पक्ष प्रतोद रफिक मुल्ला यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांना होणाऱ्या मानसिक त्रासाबाबत आपली बाजू मांडली.
त्या म्हणाल्या भरत लठ्ठे यांच्यावर विश्वास ठेवून नेते महावीर गाठ यांनी त्यांना उपनगराध्यक्ष व पक्ष प्रतोद अशी जबाबदार दोन्हीही पदे दिली होती. पक्षाच्या इतर नगरसेवकांनाही पदाचा मान सन्मान मिळण्यासाठी त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी पदाचा राजीनामा देणे तर सोडाच स्वपक्षाच्याच आम्हा तिघींचे नगरसेवक पद अपात्र ठरविण्यासाठी आम्हांला न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हा प्रकार २८जानेवारीपर्यंत थांबवावा, अन्यथा घरावर धडक मारून बांगड्यांचा आहेर देणार आहोत. यावेळी अमित गाठ, नगरसेवक सचिन गाठ, नगरसेविका अनिता मुधाळे, राजू साळोखे, शशिकांत मुधाळे, अभिनव गोंधळी उपस्थित होते.