गारगोटी : महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडपुकारलेल्या एकनाथ शिंदे यांच्यागटात सामील झालेले आमदार प्रकाश आबिटकर यांच्या निवासस्थानावर आज, बुधवारी शिवसैनिकांनी मोर्चा काढला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी आबिटकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त शिवसैनिक आबिटकरांच्या निवासस्थानाकडे कूच करत असताना पोलिसांनी अडवले असता तणाव निर्माण झाला.
शिवसेना प्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. संपूर्ण शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत आंदोलन पार पडले.या आमदारांचे करायचे काय? खाली डोके वर पाय अशा घोषणा देत शिवसैनिकांनी येथील क्रांतीज्योती जवळ आंदोलन केले. त्यानंतर आमदार आबिटकर यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी शिवसैनिकांनी कूच केली. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलनकर्ते आल्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी तणाव निर्माण झाला होता.
यावेळी संजय पवार म्हणाले, राधानगरी विधानसभा मतदार संघासाठी १५० कोटी रुपये निधी दिला आणि काय द्यायचे? आमदार आबिटकर अजूनही वेळ गेलेली नाही, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागा आणि पुन्हा पक्षात सामील व्हा. आम्ही तुमचे कोल्हापुरात जंगी स्वागत करू असे आवाहन केले. यावेळी विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांची भाषणे झालीत.या आंदोलनात चंदगड संपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, तालुका प्रमुख अविनाश शिंदे, यांच्यासह सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. आज गारगोटीचा आठवडी बाजार सकाळच्या सत्रात बंद करण्यात आला होता. गारगोटीत येणाऱ्या सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.