कोल्हापूर : चालू गळीत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, वीजबिलांतील त्रुटी दूर करा, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांसह आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला जाणार असून, त्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे. चालू हंगामात एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी संघटनेने केली होती. सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे, मात्र उर्वरित दोनशे रुपये कधी देणार, अशी विचारणा संघटनेने केली आहे. वीजबिले भरण्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असताना त्यांच्या प्रश्नांबाबत मात्र महावितरण उदासीन आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
दुपारी १२ वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून, राजाराम महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक दिली जाणार आहे.
मोर्चाची महिनाभर तयारी
गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे. त्यामुळे मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी, वीजग्राहक सहभागी होतील, असा दावा ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी केला आहे.