कोल्हापूर : एफआरपीचा दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा. वीज जोडण्या तोडण्याची कारवाई त्वरित थांबवा, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी दि.१४ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक देणार आहेत. त्या दिवशी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याच्या निर्णयाची महाविकास आघाडी सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी. या रकमेतून वीज बिलाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात होईल. त्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील. एफआरपी वाढली असली, तरी खत, इंधन दरवाढ आणि उत्पादन खर्च पाहता गेल्या तीन वर्षांपूर्वी इतकीच एफआरपी सध्या मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे दोनशे रुपयांचा दुसरा हप्ता लवकर मिळावा.कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल वसुली चांगली आणि वीज गळती, चोरी अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. तरीही थकबाकीचा मुद्दा पुढे करून येथील शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याची कारवाई महावितरण करत आहे. ते थांबविण्यात यावे. दोन तास वीज वाढवून द्यावी. वीजदर कमी करावा. भूमी अधिग्रहण कायद्यातील नव्या दुरुस्तीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. ते अन्यायकारक असून, पूर्वीप्रमाणे मोबादला मिळावा. महापुरात बुडालेला ऊस तोडण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांना ऊसतोडणीची सूचना द्यावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, वैभव कांबळे, अनिल मादनाईक, राजेंद्र गड्ड्यानवार आदींची उपस्थिती होती.
मंत्र्यांची दालने सजवायला पैसे कसे येतात?
वीज बिल थकबाकीमुळे राज्य अंधारात जाईल, असे ऊर्जामंत्री सांगत आहेत. मला, त्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, अशी स्थिती राज्यात असेल, तर मंत्र्यांची दालने सजवायला, नवीन वाहने घ्यायला पैसे कसे येतात? शेतकऱ्यांची अशी किती थकबाकी आहे. त्यांना देय असणाऱ्यांना ५० हजार रुपयांतून वीज बिलाची रक्कम घ्यावी. ही रक्कम देतो असे केवळ उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात; पण देतही नाहीत. त्यांना या अर्थसंकल्पात हे पैसे देण्याची तरतूद करावी; अन्यथा मंत्र्यांना ग्रामीण भागात फिरू देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
पालकमंत्री कुठे गायब?
वीज दरवाढीच्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील माझ्या खांद्याला खांदा लावून लढत होते. मात्र, आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याची महावितरणकडून कारवाई होताना पालकमंत्री पाटील कुठे गायब आहेत, अशी विचारणा शेट्टी यांनी केली.