कोल्हापूर : ‘सनातन प्रभात’ संघटनेच्या कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलातर्फे आज, मंगळवारी निघणाऱ्या मोर्चास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोणत्याही धर्माच्या विरोधात मोर्चा काढता येत नाही, त्यातूनही हा मोर्चा काढून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सोमवारी दिला. डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या खुनाशी सनातन संघटनेचा संबंध असल्याचे जनतेला वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर यासंबंधी विचारणा करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे संघटनेच्या शाहूपुरीतील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे संयोजक अनिल ंम्हमाणे यांनी जाहीर केले होते, परंतु हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मोर्चाला परवानगी देऊ नये, अन्यथा प्रतिमोर्चा काढू, असा इशारा दिला होता. सोमवारी श्रमिक दलाच्यावतीने मोर्चास परवानगी मिळावी, असे लेखी पत्र पोलीस अधीक्षकांना मिळाले. त्यांनी कोणत्याही धर्माच्या विरोधात मोर्चा काढता येत नसल्याच्या कारणावरून श्रमिक दलाच्या मोर्चास परवानगी नाकारली आहे तसे लेखी संघटनेच्या सदस्यांनाही कळविल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले. त्यातूनही मोर्चा काढून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही डॉ. शर्मा यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी) परवानगी नसली तरी मोर्चा काढणारच : म्हमाणे‘सनातन प्रभात’ने डॉ. दाभोळकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बाबतीत द्वेष निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केला होता. पानसरे यांची हत्या झाली त्याच्यानंतरही त्यांनी आक्षेपार्ह लिखाण केले आहे. पानसरेंच्या हत्येमागे ‘सनातन प्रभात’ संघटनेचा हात असण्याची शक्यता आहे. आता त्यांच्याकडून डॉ. भारत पाटणकर यांना टार्गेट केले जात आहे. मोर्चास पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी पुरोगामी नेत्यांचा जीव धोक्यात असल्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी मंगळवारी मोर्चा काढणार असल्याचे संयोजक अनिल म्हमाणे यांनी सांगितले.
‘सनातन’वर मोर्चास परवानगी नाकारली
By admin | Published: March 23, 2015 11:43 PM