इचलकरंजी : गॅस दरवाढीविरोधात येथील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्रवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याठिकाणी महिलांनी चुली पेटवून त्यावर भाकरी करत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच निषेध व्यक्त करून शंखध्वनी आंदोलन केले.
स्टेशन रोडवरील शिवसेनेच्या कार्यालयापासून मोर्चा निघाला. मुख्य मार्गावरून फिरून प्रांत कार्यालय येथे आल्यावर तेथे चुली पेटवून आंदोलन करण्यात आले. मोर्चामध्ये सिलिंडर टाकी डोक्यावर घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. ‘गॅस दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी महागाई कमी करू, गॅसचे दर नियंत्रणात ठेवू, असे आश्वासन दिले होते; परंतु गॅस दरामध्ये सातत्याने वाढ होत असून, महिला वर्गाला घर चालवणे अडचणीचे बनत आहे. केंद्र शासनाने गॅसचे दर कमी करून त्यावरची मिळणारी सबसिडी पूर्ववत करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा देण्यात आला. मोर्चामध्ये उमा गौड, मंगल चव्हाण, मंगल मुसळे, सुवर्णा धनवडे, दीप्ती कोळेकर, माधुरी ताकारे, आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.
फोटो ओळी १२०२२०२१-आयसीएच-०२ इचलकरंजीत घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेनेच्या महिला आघाडीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच चुली पेटवून निषेध व्यक्त केला.
(छाया - उत्तम पाटील)